Saturday 6 October 2018

कादंबरीकार कृष्णात खोत यांच्या हस्ते वाङ्मय मंडळाचे उदघाटन

जनतेचा खरा आधार साहित्यिक असतो. जनतेच्या पाठी नेहमी लेखक असतो; तो सामान्यांचे जगणे मांडतो आणि असे साहित्य जगण्याला आधार देते.असे उद्गार प्रसिद्ध साहित्यिक श्री. कृष्णात खोत यांनी काढले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वाङ्मय मंडळाच्या उदघाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत साहित्याची निर्मिती प्रक्रिया, साहित्यिक निर्मितीविश्वातला त्यांच्या प्रवास विद्यार्थ्यांना सविस्तरपणे कथन केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रसिद्ध साहित्यिक कृष्णात खोत यांच्या हस्ते साहित्य सौरभया भित्तिपत्रकाचे अनावरण करण्यात आले. यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा. गोपाळे यांनी महाविद्यालयाच्या वाङ्मय मंडळाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेऊन नियोजित कार्यक्रमांची रूपरेषा विशद केली. याप्रसंगी विद्यापीठ युवा संसद स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांकाची पारितोषिव विजेती विद्यार्थींनी कु. प्रिया पेडणेकर आणि मार्गदर्शक तसेच महाविद्यालयाच्या वक्तृत्व आणि वादविवाद समितीचे समन्वयक प्रा. जयंत अभ्यंकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महाविद्यालयाचे वाङ्मय मंडळ विविध साहित्यविषयक उपक्रम नेहमी आयोजित करत असते. या सर्व उपक्रमांचा औपचारिक शुभारंभ प्रसिद्ध कादंबरीकार कृष्णात खोत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, वाङ्मय मंडळ प्रमुख प्रा. शिवराज गोपाळे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन जागृती महाडिक या विद्यार्थिनीने केले. सदर कार्यक्रमाला प्राध्यापक आणि विद्यार्थी यांची लक्षणीय उपस्थिती लाभली होती.

वाङ्मय मंडळाच्या साहित्य सौरभ या भित्तीपत्रकाबाबत माहिती घेताना कादंबरीकार कृष्णात खोत 


प्रा. जयंत अभ्यंकर यांना गौराविताना श्री. खोत सोबत उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये तसेच वाङ्मय मंडळ प्रमुख प्रा. शिवराज गोपाळे 

उपस्थितांशी संवाद साधताना कादंबरीकार कृष्णात खोत 


Thursday 27 September 2018

मा. विनय धुमाळे यांनी केले मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

मराठी विभागातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ख्यातनाम निर्माते आणि मुंबई दूरदर्शनच्या स्थापनेतील अग्रणी मा. विनय धुमाळे

Thursday 6 September 2018

मराठी विभागाच्या 'लेखक आपल्या भेटीला' कार्यक्रमांतर्गत पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचे व्याख्यान

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने दिनांक २ सप्टेंबर २०१८ रोजी 'लेखक आपल्या भेटीला' कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी ख्यातनाम साहित्यिक आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, प्रसिद्ध कवी महेश केळुस्कर, शशिकांत तिरोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, प्रसिद्ध कवी महेश केळुस्कर, शशिकांत तिरोडकर यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, मराठी विभागप्रमुख प्रा. शिवराज गोपाळे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष आणि रत्नागिरीच्या सांस्कृतिक क्षेत्रातील सक्रीय व्यक्तिमत्व प्रकाश दळवी यांचीही उपस्थिती लाभली. कार्यक्रमादरम्यान महेश केळुस्कर आणि शशिकांत तिरोडकर यांनी आपल्या कवितांचे अभिवाचन केले. महाविद्यालयीन जीवनातील तारुण्यसुलभ भावना व्यक्त करणाऱ्या महेश केळुस्कर यांच्या कवितांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तर शशिकांत तिरोडकर यांच्या 'पत्र' कवितेने विद्यार्थ्यांना भावूकही केले.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी महाविद्यालयाशी असणाऱ्या त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त विंदा करंदीकर गोगटे जोगळेकर महाविद्यालयात अध्यापक असताना कवी आरती प्रभूंसह त्यांची घेतलेली भेट, मॅट्रीकच्या परीक्षेचे प्रसंग, लेखक म्हणून प्रस्थापित होईपर्यंत वाट्याला आलेला संघर्ष त्यांनी विद्यार्थ्यांसमोर कथन केला.विद्यार्थ्यांना लेखनाविषयी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, नव्या लेखकांनी आपल्या अनुभवातून, आपल्या आजूबाजूच्या वास्तव जीवनातले संकेत वापरून लिहायला हवे. जेव्हा असे अस्सल जीवनानुभव तुमच्या लेखनात येतील तेव्हाच खऱ्या अर्थाने ती तुमची नवनिर्मिती असेल.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. त्याचप्रमाणे महाविद्यालयाची वैभवशाली परंपरा उत्तरोत्तर उन्नत ठेवण्याची ग्वाही दिली. याप्रसंगी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविताना पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी केलेल्या भाषणाच्या प्रती विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय सुतार याने केले. या कार्यक्रमाकरिता महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, यावेळी मंचावर उपस्थित प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, कवी महेश केळुस्कर, कवी शशिकांत तिरोडकर, मराठी विभागप्रमुख प्रा. शिवराज गोपाळे.

ओंकार ओक या विद्यार्थ्यास प्रातिनिधिक स्वरुपात अध्यक्षीय भाषणाची प्रत देताना पद्मश्री मधु मंगेश कर्णिक 

मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांसह उपस्थित मान्यवर 

Thursday 30 August 2018

मूकबधिर विद्यालयात रंगला अनोखा रक्षाबंधन सोहळा

संस्कृतीतील पारंपरिक सणांना नवे परिमाण देणे ही काळाची गरज आहे. महाविद्यालयात शिकत असताना अभ्यासाच्या बरोबरीनेच हे सामाजिक भानही विद्यार्थ्यांनी जपले. द्वितीय वर्ष कला शाखेत शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनचा सण असाच काहीसा वेगळ्या पद्धतीने साजरा केला.

द्वितीय वर्ष कला शाखेत शिकणाऱ्या मराठी विभागाच्या जागृती महाडिक, रश्मी नाटेकर, सोहन कांबळे तसेच अन्य विभागातील अमृता नायक, प्रसाद जांगळे, राज पोलिस या विद्यार्थ्यांनी हा अभिनव उपक्रम केला. या विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने स्वतः राख्या तयार करून शहरातील केशव परशुराम अभ्यंकर मूकबधिर विद्यालयात रक्षाबंधनाचा सण साजरा केला. केवळ तेथील मुलांना राख्या बांधून हे विद्यार्थी थांबले नाहीत तर तेथील मुलींनाही राख्या बांधून स्त्री-पुरुष समानतेचे आणि स्त्री-सक्षमीकरणाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. मूकबधिर विद्यालयातील सर्वच मुलांनी आणि मुलींनीही या अनोख्या रक्षाबंधन सोहळ्याचा आनंद लुटला. त्यानंतर सर्व मुलांना खाऊचे वाटप करून विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा समारोप केला. विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरेणेतून राबविलेल्या या उपक्रमाचे अभ्यंकर मूकबधिर विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी आणि शिक्षकांनी विशेष कौतुक केले.

मूकबधिर विद्यालयाच्या मुख्याध्यापकांसोबत विद्यार्थी 

मुलींनाही रक्षाबंधन 

ओवाळीते भाऊराया 


खाऊवाटप 



आशुतोष नाडकर्णीने साकारली मराठी चित्रपटात भूमिका

मराठी विभागाचा विद्यार्थी आशुतोष नाडकर्णी याने १८ मे २०१८ रोजी प्रदर्शित झालेल्या 'वेडं मन तुझ्यासाठी' या मराठी चित्रपटात गौरांग या नायकाच्या मित्राची भूमिका साकारली. या चित्रपटाची निर्मिती प्रितीश कामत यांनी ड्रीम वे फिल्म कंपनी या संस्थेंतर्गत केली होती. या चित्रपटात अनुराग वरळीकर, कोमल जोशी, सीमा घोगळे, केदार कुलकर्णी यांनीही अभिनय साकारला.

आशुतोष नाडकर्णी

अभिनेत्री सीमा घोगळे यांच्यासोबत आशुतोष


चित्रपटातील एका दृश्यात सहकलाकारांसोबत आशुतोष

पत्रकारिता विषयाच्या विद्यार्थ्यांची महाविद्यालयाच्या ग्रंथालयाला भेट

मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांची ‘भारतमातेस पत्ररूपी भेट’

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मराठी विभागाने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भारतमातेस पत्ररूपीअनोखी भेट दिली.
विद्यार्थी वर्ग आजकाल पत्र लिहिण्यास विसरला असल्याने मराठी विभागाने विद्यार्थ्यांना प्रेरणा देत पोस्ट कार्ड लिहिण्यास प्रवृत्त केले. आईचे पत्र हरवलं’, ‘डाकिया डाक लायायासारखे खेळ आणि गाणी कालौघात लुप्त होत चालल्याने पत्र लेखनाचा संस्कार विद्यार्थ्यांवर व्हावा असा हेतू समोर ठेऊन सदर उपक्रम घेण्यात आला. या पत्र लेखन स्पर्धेत कु. साक्षी पंडित प्रथम, ऋतुराज मराठे द्वितीय, शुभराणी होरंबे तृतीय क्रमांकाचे आणि ओंकार ओक उत्तेजनार्थ विजेते ठरले. सर्व विजेत्यांना स्वातंत्र्यदिनी झालेल्या समारंभात प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सर्व पत्रे फलकावर प्रदर्शित करण्यात आली आणि नंतर शहीद जवान स्मारक, देवरुख,ता. संगमेश्वर येथे प्रदर्शनास पाठवण्यात आली आहेत. या उपक्रमात अनेक विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. विभागप्रमुख प्रा. शिवराज गोपाळे, डॉ. निधी पटवर्धन आणि प्रा. सायली पिलणकर यांनी या उपक्रमाकरिता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


मराठी विभागाचा पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप उपक्रम

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात मराठी विभागाच्या पत्रकारिता प्रशिक्षुता (इंटर्नशिप) उपक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतेच संपन्न झाले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून दै. तरुण भारतचे मुख्य प्रतिनिधी सुकांत चक्रदेव उपस्थित होते.
व्यासपीठावर लांजा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, मराठी विभागप्रमुख प्रा. शिवराज गोपाळे उपस्थित होते. दै. तरुण भारत यांच्या सहकार्याने सादर उपक्रम राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला प्रशिक्षुतेच्या (इंटर्नशिप) माध्यमातून विविध आयाम प्राप्त व्हावेत, भविष्यात पत्रकारितेच्या माध्यमातून रोजगार संधी उपलब्ध व्हावी म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर प्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी आणि उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सीमा वीर यांनी केले.
पुढील सत्रात श्री. सुकांत चक्रदेव यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी उपक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली. उपक्रमाची प्रमुख म्हणून पर्णिका भडसावळे तर उपप्रमुख म्हणून सोह कांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.



संत एकनाथ महाराजांचे संक्षिप्त चरित्र

संत एकनाथ महाराजांचे संक्षिप्त चरित्र
लेखक : ल. रा. पांगारकर
प्रकाशन : 1911

समर्थ ग्रंथभांडार

भाषिक सापेक्षतावादाचा सिद्धांत

Wednesday 29 August 2018

मराठी विभाग आयोजित Add on courseच्या विद्यार्थ्यांनी केले श्रावण महोत्सव २०१८चे नियोजन

शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये मराठी विभागाने द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी लेखन आणि सादरीकरण कौशल्ये हा Add on course राबविला. यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी नगर वाचनालय आणि मिती क्रिएशन तर्फे आयोजित ‘श्रावण महोत्सव’ या भव्य पाककला स्पर्धेचे नियोजन केले.  या पाककला स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 62 महिला यात सहभागी झाल्या होत्या.  
श्रावणमहोत्सव २०१८ महाराष्ट्र दौरा’ या पाककला सोहळयाचं आयोजन दादर,  डोंबिवलीवसईपनवेलनेरूळसोलापूररत्नागिरीकोल्हापूरचिपळूण आणि पुणे अशा दहा शहरांमध्ये करण्यात आले होते.
या स्पर्धेची तिसरी प्राथमिक फेरी रत्नागिरी शहरात रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय यांच्या सहकार्याने दिनांक १९ ऑगस्ट २०१८ रोजी सायं ४ वाजतारत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय सभागृहात संपन्न झाली.  ‘मक्यापासून बनवलेला एक पदार्थ’ असा स्पर्धेचा विषय होता.
रत्नागिरीतील फेरीत शेफ तुषार प्रीती देशमुख आणि उत्तरा मोने हे मुख्य परीक्षक होते. रत्नागिरीतील स्वप्ना पटवर्धन आणि सीमा श्रीखंडे यांनीही परीक्षकाची भूमिका बजावली. या स्पर्धेची निर्मिती गेले पंचवीस वर्ष इव्हेंट्स आणि मिडिया या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या उत्तरा मोने यांच्या मिती क्रिएशन्सची होती. तसेच श्रावण महोत्सवाच्या रत्नागिरी सेंटरच्या सिटी हेड म्हणून डॉ. निधी पटवर्धन यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केल्याबद्दल आयोजक आणि परीक्षकांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
शेफ तुषार प्रीती देशमुख यांच्यासोबत विद्यार्थी


मराठी विभाग आयोजित Add on courseच्या विद्यार्थ्यांचा समूहगीत स्पर्धेत सहभाग

शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये मराठी विभागाने द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी लेखन आणि सादरीकरण कौशल्ये हा Add on course राबविला. यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने आयोजित समूहगीत गायन स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेत आशुतोष नाडकर्णी, संकेत पाडळकर, पूर्वा सावंत, रेणुका सरदेसाई, पूर्वा देवस्थळी, काजल चव्हाण या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांच्या गायलेल्या वंदे मातरम् या  समूह्गीताचे संगीत दिग्दर्शन दीप्ती आगाशे यांनी केले. तर हार्मोनियम साथ अक्षय पेडणेकर आणि तबला साथ सुश्रुत चितळे याने केली. या गीताला परीक्षक आणि श्रोते यांची उत्स्फूर्त दाद मिळाली.

समूहगीत सादर करताना डावीकडून संकेत पाडळकर, काजल चव्हाण, पूर्वा सावंत, रेणुका सरदेसाई, पूर्वा देवस्थळी, आशुतोष नाडकर्णी 

Thursday 23 August 2018

पत्रकारिता विषयाची रत्नभूमी प्रेसला क्षेत्रीय भेट

दि. १२ ऑगस्ट २०१८ रोजी द्वितीय वर्ष (पत्रकारिता) वर्गाच्या विद्यार्थ्यांनी कुवारबाव येथील रत्नभूमी प्रेसला एकदिवसीय क्षेत्रीय भेट दिली.या उपक्रमात रत्नभूमी प्रेसच्या संपादिका धनश्री पालांडे व कार्यकारी संपादक अंकुश कदम यांनी मार्गदर्शन केले. एकूण दोन सत्रांमध्ये क्षेत्रीय भेटीचे कामकाज पार पडले.या उपक्रमासाठी मराठी विभाग प्रमुख श्रीशिवराजगोपाळे  व  प्रा. सीमा वीर उपस्थित होते.
        पहिल्या सत्राच्या सुरवातीला पत्रकारिता क्षेत्रातील समज-गैरसमज, संवाद कौशल्ये यांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.यानंतर रत्नभूमि या कोकणातील पहिल्या दैनिकाचाइतिहासव रत्नभूमि जर्नालिझम काùलेजचे उपक्रम याबाबत माहिती देण्यात आली.रत्नभूमि दैनिकाचे ट्रेडल मशीनवर छापलेले अंक विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.यापुढील भागात मुद्रणकलेचा इतिहास  यावर विद्यार्थ्यांना विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले.मुद्रणकलेचा जनक योहान गुटेनबर्ग, भारतातील मुद्रणाची वाटचाल, अक्षरतंत्र छपाई,ट्रेडल मशीन,ùफसेट छपाई इ.घटकांचा यात समावेश होता.ट्रेडल मशीनवर जुळणी करताना वापरण्यात येणारे टाईपचे नमुने यावेळी विद्यार्थ्यांना माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात आले.
                 दुस-या सत्रात श्रीमती धनश्री पालांडे यांनी संगणकीय अक्षरजुळणी याबाबत मार्गदर्शन केले. यामध्ये अक्षरजुळणी, पृष्ठमांडणी याची सविस्तर माहिती देण्यात आली. श्री. अंकुश कदम यांनी प्लेट मेकिंग व प्रत्यक्ष छपाई याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविले. न्यूज पेपर कसा छापला जातो याचा प्रत्यक्ष अनुभव यावेळी विद्यार्थ्यांना घेता आला.प्रात्यक्षिकानंतर बातमी कशी मिळवायची, बातमीची कार्यक्षेत्रे, डेड लाईन यांवर चर्चा झाली.विद्यार्थ्यांशी सुसंवाद हा दुस-या सत्रातीलशेवटचा टप्पा होता. यानंतर आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमाने उपक्रमाची सांगता झाली.









Wednesday 22 August 2018

राष्ट्रभक्तीपर समूहगीत स्पर्धेत मराठी वाङ्मय मंडळ प्रथम

       गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. ११ ऑगस्ट २०१७ रोजी स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने घेण्यात आलेल्या समूहगीत स्पर्धेत मराठी वाङ्मय मंडळाने प्रथम क्रमांक प्राप्त केला. मराठी वाङ्मय मंडळाच्या संघात निवेदिता कोपरकर, तेजस्विनी करंबेळकर, सायली मुळ्ये, मृणाली विभूते, पूर्वा चुनेकर, अपूर्वा कुलकर्णी आणि शांभवी पाटील या विद्यार्थिनींचा समावेश होता. हार्मोनियम साथ सायली मुळ्ये हिने तर तबला साथ सुश्रुत चितळे याने केली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रचलेले स्वतंत्रतेचे 'जयोस्तुते' हे अजरामर गीत या विद्यार्थिनींनी सादर केले. या गीताला परीक्षक आणि श्रोते विद्यार्थी यांनी भरभरून दाद दिली. या विद्यार्थिनींना स्वातंत्र्यदिनी आयोजित कार्यक्रमात रोख बक्षीस आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. 


गीत सादर करताना मराठी वाङ्मय मंडळाचा चमू

Monday 20 August 2018

देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेत मराठी विभागाच्या संघाचा सहभाग

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. १३ ऑगस्ट २०१८ रोजी स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने घेण्यात आलेल्या समूहगीत स्पर्धेत मराठी विभागाच्या महदंबा संघाने सहभाग नोंदविला. मराठी विभागाच्या संघात सायली गायकवाड, नूतन निंबरे, हर्षाली निंबरे, प्रियांका तांबे, अंकिता चव्हाण, श्रेया पाध्ये, तृप्ती धुमाळ, अक्षता शिंदे या विद्यार्थिनींचा समावेश होता. 'बलसागर भारत होवो' ही साने गुरुजी यांची रचना विद्यार्थिनींनी सादर केली. या संघातील हर्षाली निंबरे व अक्षता शिंदे या विद्यार्थिनींची विद्यापीठ स्तरावरील कव्वाली गायन स्पर्धेच्या संघाकरिता निवड करण्यात आली. 

समूहगीतसादर करताना मराठी विभागाचा संघ

Sunday 19 August 2018

राष्ट्रभक्तीपर समूहगीत स्पर्धेत मराठी वाङ्मय मंडळ प्रथम

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. १३ ऑगस्ट २०१८ रोजी स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने घेण्यात आलेल्या समूहगीत स्पर्धेत मराठी वाङ्मय मंडळाने प्रथम क्रमांक प्राप्त केला. मराठी वाङ्मय मंडळाच्या संघात निवेदिता कोपरकर, तेजस्विनी करंबेळकर, सायली मुळ्ये, अस्मिता गोखले, ऋतुजा वझे, श्रद्धा टिकेकर या विद्यार्थिनींचा समावेश होता. हार्मोनियम साथ सायली मुळ्ये हिने तर तबला साथ सुश्रुत चितळे याने केली. 'है अमन की पहचान मेरे देश का झंडा' हे कव्वाली प्रकारातील गीत या विद्यार्थिनींनी सादर केले. या गीताला परीक्षक आणि श्रोते विद्यार्थी यांनी भरभरून दाद दिली. या सर्व विद्यार्थिनींची विद्यापीठ स्तरावरील कव्वाली गायन स्पर्धेच्या संघाकरिता निवड करण्यात आली. या विद्यार्थिनींना स्वातंत्र्यदिनी आयोजित कार्यक्रमात रोख बक्षीस आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. 
गीत सादर करताना मराठी वाङ्मय मंडळाचा चमू
वाङ्मय मंडळाच्या संघाकरिता सलग तीन वर्षे तबला साथ करणारा सुश्रुत चितळे
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या हस्ते बक्षीस स्वीकारताना वाङ्मय मंडळाचा चमू सोबत मार्गदर्शिका डॉ. निधी पटवर्धन, प्रा. सायली पिलणकर



राष्ट्रभक्तीपर समूहगीत स्पर्धेत मराठी वाङ्मय मंडळ प्रथम

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने घेण्यात आलेल्या समूहगीत स्पर्धेत मराठी वाङ्मय मंडळाने प्रथम क्रमांक प्राप्त केला. या विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनी आयोजित कार्यक्रमात रोख बक्षीस आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. मराठी वाङ्मय मंडळाच्या संघात मृणाली विभूते, तेजस्विनी करंबेळकर, सायली मुळ्ये, पूर्वा चुनेकर, गायत्री देसाई, पर्णिका भडसावळे या विद्यार्थिनींचा समावेश होता. हार्मोनियम साथ सायली मुळ्ये हिने तर तबला साथ सुश्रुत चितळे याने केली. 


मराठी वाङ्मय मंडळाच्या संघातील विद्यार्थिनींसह मार्गदर्शिका डॉ. निधी पटवर्धन

Wednesday 4 April 2018

वाचन प्रेरणा दिनानिमित्त मराठी विभागाची केशवसुत स्मारकाला भेट

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन सर्वत्र वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मराठी विभागाने केशवसुत स्मारकाला भेट दिली.  यामध्ये मराठी विभागप्रमुख प्रा. शिवराज गोपाळे, प्रा. सायली पिलणकर, समाजशास्त्र विभागाचे प्रा. शिवाजी उकरंडे यांच्यासह महाविद्यालयाच्या विविध विभागांतील सुमारे 20 विद्यार्थ्यांचा समावेश होता. यावेळी स्मारकातील ग्रंथालयात कवी केशवसुत, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्याचप्रमाणे स्मारक परिसरात बांधण्यात आलेल्या पद्मश्री मधु मंगेश कर्णिक रंगमंचावर विद्यार्थ्यांनी कवी केशवसुतांच्या कवितांवर आधारित कार्यक्रम सादर केला. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा मालगुंडचे मा. माधव अंकलगे आवर्जून उपस्थित होते. पद्मश्री मधु मंगेश कर्णिक रंगमंचावर झालेला हा पहिलाच कार्यक्रम असल्याचे त्यांनी सहर्ष नमूद केले. यावेळी विद्यार्थ्यांनी कवी कुसुमाग्रजांचे घर, उभारण्यात आलेले काव्यदालन आणि ग्रंथालय पाहिले. तसेच कवी केशवसुतांच्या योगदानाचे स्मरण केले. 



गोगटे जोगळेकर महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन २०१६

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन सर्वत्र वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या बाबुराव जोशी ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे महाविद्यालयाच्या ज. शं. केळकर सभागृहात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. रमेश कांबळे, मराठी विभागप्रमुख प्रा. शिवराज गोपाळे, विशेष व्याख्याते म्हणून देवरुख येथील ज्येष्ठ भाषाभ्यासक डॉ. सुरेश जोशी  आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी होतकरू विद्यार्थी पुस्तकपेढी योजनेतून पात्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुस्तकांचे वाटप करण्यात आले.



Tuesday 3 April 2018

३३ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनात प्रा. शिवराज गोपाळे यांचे निबंधवाचन

वाशिम येथे १३ व १४ फेब्रुवारी २०१६ रोजी झालेल्या ३३ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनात प्रा. शिवराज गोपाळे यांनी समकालीन दलित कवितेवर आधारित शोधनिबंधाचे वाचन केले.


नंदिनी आगाशे यांच्याकडून मराठी विभागास भेट

मराठी विभागाच्या माजी विद्यार्थिनी नंदिनी आगाशे यांनी मराठी विभागास दि. २ एप्रिल २०१८ रोजी वस्तुरूप भेट (घड्याळ) दिली. यावेळी विभागप्रमुख प्रा. शिवराज गोपाळे यांच्याकडे घड्याळ सुपूर्द करताना नंदिनी आगाशे.

Saturday 17 March 2018

‘मराठी राजभाषा दिन’ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न


गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. २७ फेब्रुवारी हा ‘मराठी राजभाषा दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने प्रा. जयश्री बर्वे यांचे ‘मराठी भाषा: जतन आणि संवर्धन’ या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
            महाविद्यालयाच्या कै. डॉ. ज. शं. केळकर सभागृहात आयोजित कार्यक्रमाचा प्रारंभ कु. पूर्वा चुनेकर हिने सादर केलेल्या ईशस्तवनाने झाली. त्यानंतर कु. निवेदिता कोपरकर हिने कवी कुसुमाग्रज यांची मराठी भाषेचा अभिमान व्यक्त करणारी ‘माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा’ ही कविता सादर केली. तसेच कु. राज्ञी सोनावणे या शालेय विद्यार्थिनीने मराठी भाषा दिनानिमित्त लिहिलेली ‘माझी माय मराठी’ ही कविता कु. सानिका फटकुरे हिने सादर केली. यावेळी व्यासपीठावर इंग्रजी विभागप्रमुख डॉ. अतुल पित्रे उपस्थित होते.
            याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. जयश्री बर्वे म्हणाल्या, भाषेच्या उत्कर्ष हा समाजाचा उत्कर्ष तर भाषेचा ऱ्हास हा समाजाचा ऱ्हास असतो. युनेस्कोच्या अहवालानुसार जगातील सहा हजार भाषांपैकी सुमारे साडेचार हजार भाषा आज ऱ्हासाच्या वाटेवर आहेत. अशावेळी आपल्या भाषेचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी तिचे जाणीवपूर्वक जतन आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. बदलत्या जीवनशैलीनुसार भाषा उणावते आणि दुणावतेही. त्यामुळेच छत्रपती शिवरायांपासून स्वातंत्रवीर सावरकरांपर्यंत अनेकांनी भाषाशुद्धीचे प्रयत्न केले. त्यांची जाण ठेऊन आपण कटाक्षाने अचूक मराठी बोलले पाहिजे. बोलीभाषांबाबत आस्था ठेवली पाहिजे. आपल्या मराठी भाषेला वैभवाच्या शिखरावर घेऊन जायचे असेल तर विद्यार्थ्यांनी मराठी साहित्याचा जाणीवपूर्वक आस्वाद घेतला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.  
            मराठी विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सायली पिलणकर यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

मराठी : जतन... संवर्धन... या विषयावर मार्गदर्शन करताना प्रा. जयश्री बर्वे

मराठी राजभाषा दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित विद्यार्थी

"मनमे है विश्वास" - समीक्षा

द्वितीय वर्ष कला, मराठी अभ्यास पत्रिका क्रमांक २

प्रतिभासंगम राज्यस्तरीय साहित्य संमेलनात विद्यार्थ्यांचे सुयश

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित प्रतिभासंगम या राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलनात मराठी वाङ्मय मंडळाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये कथालेखन स्पर्धेत सबा बंदरी (द्वितीय वर्ष कला) हिने प्रथम आणि शार्दुल रानडे (द्वितीय वर्ष कला) याने उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले. त्याचप्रमाणे लोकशाही : काल, आज, उद्या या विषयावर आयोजित वैचारिक चर्चासत्रातही सबा बंदरी हिने उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले.

कथालेखनाचे प्रथम पारितोषिक मिळवणारी सबा बंदरी.


कथालेखनाचे उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवणारा शार्दुल रानडे 





"जस घडलं तसं" - समीक्षा

द्वितीय वर्ष कला, मराठी अभ्यास पत्रिका क्रमांक 2

Thursday 15 March 2018

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सोनाली पाटीलचे सुयश

महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे निमित्त रत्नागिरी जिल्हा पोलीस मुख्यालयामार्फत आयोजित क्रीडा महोत्सवात मराठी विभागाच्या पदव्युत्तर पदवी भाग १ या वर्गात शिकणाऱ्या सोनाली पाटील हिने बुद्धिबळ स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला. यावेळी तिला गौरविताना पोलीस अधिकारी.



देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेत मराठी विभागाच्या संघाचा सहभाग

दिनांक १३ ऑगस्ट २०१७ रोजी महाविद्यालयात झालेल्या देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेत मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यामध्ये सहभागी झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे :
१. अभिषेक देवरुखकर
२. पूजा शेट्टी
३. अक्षता बिर्जे
४. समीक्षा पालशेतकर
५. विनायक प्रभूघाटे
६. संजीवनी मांडवकर
७. निधी कशाळीकर
८. श्रुती आंब्रे
९. श्रेया पांचाळ
१०. दिव्या आंबोळकर




पदव्युत्तर पदवी

पदवी प्रथम वर्ष अभ्यासक्रम

पदवी द्वितीय वर्ष अभ्यासक्रम

तृतीय वर्ष परीक्षेत नम्रता शिंदे कला शाखेत प्रथम

शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मध्ये मुंबई विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या तृतीय वर्ष परीक्षेत मराठी संपूर्ण विषयाची विद्यार्थिनी नम्रता उदय शिंदे ८२.१६ टक्के गुण प्राप्त करत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कला शाखेत प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. यानिमित्त तिला प्राचार्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे महाविद्यालयाच्या वार्षिक युवा महोत्सवातही तिचा गौरव करण्यात आला.


नम्रता शिंदे हिला गौरविताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, सोबत कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, मराठी विभागप्रमुख प्रा. शिवराज गोपाळे, डॉ. निधी पटवर्धन, प्रा. सायली पिलणकर


झेप युवा महोत्सवात नम्रता शिंदे हिला भेटवस्तू देऊन गौरवताना वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे सोबत डॉ. निधी पटवर्धन


पदवीदान समारंभप्रसंगी नम्रता शिंदे हिला गौरविताना डॉ. किशोर माणगावकर

Wednesday 14 March 2018

मुंबई विद्यापीठाच्या पीएच.डी गाईड म्हणून डॉ. निधी पटवर्धन यांना मान्यता


    रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील मराठी विभागात कार्यरत असलेल्या डॉ. निधी पटवर्धन यांना मुंबई विद्यापीठाची 'मराठी' विषयासाठी पीएच.डी गाईड म्हणून मान्यता मिळाली आहे. एम. फील चे दोन विद्यार्थी तर पीएच.डीच्या चार विद्यार्थ्यांना त्या गाईड करणार आहेत. सध्या मुंबई विद्यापीठातील एम. फील. ची कु. रिना शेवाळे ही प्रथम विद्यार्थिनी प्रविष्ट झाली असून  "महात्मा फुले यांच्यावरील  चरित्रात्मक नाटके" या विषयावर डॉ. निधी पटवर्धन मार्गदर्शन करत आहेत.

      डॉ. निधी पटवर्धन यांचे अनेक शोधनिबंध विद्द्वप्रणीत मासिकांमध्ये प्रसिद्ध झाले असून त्यांचा 'पिंटी' हा बालकथासंग्रह स्वा. रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात एम.ए.च्या अभ्यासक्रमात 'बालकुमार साहित्य' या अभ्यासपत्रिकेत समाविष्ट झाला आहे. यावर्षी बडोदा येथे होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात त्यांना दि. १७ फेब्रुवारी रोजी 'कथा व निवेदन' या विषयावर बोलण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. लवकरच त्यांचा  'चिंतनफुले' हा ललितलेख संग्रह स्पर्श प्रकाशनातर्फे प्रकाशित होणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.      

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

 गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त  दोन विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 'स्...