गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त दोन विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 'स्त्री, भूमी आणि भाषा' या विषयावर ललित लेखिका रश्मी कशेळकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला तर 'कथाकथन : सराव आणि सादरीकरण' या कार्यक्रमात मुंबई विद्यापीठ युवा महोत्सव सुवर्णपदक विजेती साक्षी चाळके हिने विद्यार्थ्यांसमोर कथाकथन सादर केले.
मराठी विभाग प्रमुख प्रा. शिवराज गोपाळे यांनी प्रास्ताविक करून मराठी विभाग भाषा संवर्धनासाठी आणि विद्यार्थीकेंद्री उपक्रमांसाठी कसा कार्यरत असतो हे सांगितले. बोली जिवंत राहिली पाहिजे, यासाठी प्रत्येक व्यक्तीने प्रयत्नशील असावे. कोकणातील बोली समृद्ध होण्यासाठी जास्तीत जास्त साहित्य लिहिले गेले पाहिजे. जसे सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोलीतून लेखक लिहितात तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील तरुणांनी स्वतःच्या बोलीत वास्तव जीवनात आलेले अनुभव साहित्यातून मांडले पाहिजेत. मराठी प्रमाण भाषेबरोबरच स्थानिक बोलींचे संवर्धन करणे गरजेचे आहे. बोली टिकली, तरच मराठी भाषा टिकेल. स्वतःच्या बोलीला कमी न समजता सार्वजनिक ठिकाणी अभिमानाने बोलली पाहिजे. असे प्रतिपादन ललित लेखिका रश्मी कशेळकर यांनी केले.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दुसर्या दिवशी मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात कथाकथन स्पर्धेत दोनदा सुवर्णपदक प्राप्त झालेली विद्यार्थिनी साक्षी चाळके हिने 'सॅल्यूट' आणि 'श्रीनिवास पानसेचे अंगण' या दोन कथांचे सादरीकरण केले. तिला प्रकट मुलाखतीतून डॉ. निधी पटवर्धन यांनी बोलते केले. कथाकथन, अभिनय, वक्तृत्व, सूत्रसंचालन यातील सीमारेषा कशा धुसर असतात, कथांची निवड कशी महत्त्वाची ठरते आणि एक स्पर्धक म्हणून आपण खिलाडू कसे असले पाहिजे याविषयी साक्षीने विद्यार्थ्यांशी संवाद केला.
डॉ. चित्रा गोस्वामी यांनी व्यक्त होणे गरजेचे असते. आंतरसंवाद साधला की अभिव्यक्ती उत्तम होते. स्वतःचे छंद शोधा, लिहिते व्हा. असा संदेश अध्यक्षीय भाषणात दिला. यावेळी भाषेचे विभाग प्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सीमा वीर यांनी केले.
No comments:
Post a Comment