रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर
महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने दिनांक २ सप्टेंबर २०१८ रोजी 'लेखक आपल्या
भेटीला' कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी ख्यातनाम साहित्यिक आणि कोकण
मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, प्रसिद्ध कवी महेश
केळुस्कर, शशिकांत तिरोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉलमध्ये आयोजित
या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, प्रसिद्ध कवी महेश
केळुस्कर, शशिकांत तिरोडकर यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर,
कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, मराठी विभागप्रमुख प्रा. शिवराज
गोपाळे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे
कोषाध्यक्ष आणि रत्नागिरीच्या सांस्कृतिक क्षेत्रातील सक्रीय व्यक्तिमत्व प्रकाश
दळवी यांचीही उपस्थिती लाभली. कार्यक्रमादरम्यान महेश केळुस्कर आणि शशिकांत
तिरोडकर यांनी आपल्या कवितांचे अभिवाचन केले. महाविद्यालयीन जीवनातील तारुण्यसुलभ
भावना व्यक्त करणाऱ्या महेश केळुस्कर यांच्या कवितांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त
प्रतिसाद दिला. तर शशिकांत तिरोडकर यांच्या 'पत्र' कवितेने विद्यार्थ्यांना
भावूकही केले.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पद्मश्री मधु मंगेश कर्णिक
यांनी महाविद्यालयाशी असणाऱ्या त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. ज्ञानपीठ
पुरस्कारप्राप्त विंदा करंदीकर गोगटे जोगळेकर महाविद्यालयात अध्यापक असताना कवी
आरती प्रभूंसह त्यांची घेतलेली भेट, मॅट्रीकच्या परीक्षेचे प्रसंग, लेखक म्हणून
प्रस्थापित होईपर्यंत वाट्याला आलेला संघर्ष त्यांनी विद्यार्थ्यांसमोर कथन केला.विद्यार्थ्यांना
लेखनाविषयी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, नव्या लेखकांनी आपल्या अनुभवातून,
आपल्या आजूबाजूच्या वास्तव जीवनातले संकेत वापरून लिहायला हवे. जेव्हा असे अस्सल
जीवनानुभव तुमच्या लेखनात येतील तेव्हाच खऱ्या अर्थाने ती तुमची नवनिर्मिती असेल.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्यांनी
उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. त्याचप्रमाणे महाविद्यालयाची वैभवशाली परंपरा
उत्तरोत्तर उन्नत ठेवण्याची ग्वाही दिली. याप्रसंगी अखिल भारतीय मराठी साहित्य
संमेलनाचे अध्यक्षपद भूषविताना पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी केलेल्या
भाषणाच्या प्रती विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
विजय सुतार याने केले. या कार्यक्रमाकरिता महाविद्यालयातील विद्यार्थी आणि
प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते.
|
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, यावेळी मंचावर उपस्थित प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, कवी महेश केळुस्कर, कवी शशिकांत तिरोडकर, मराठी विभागप्रमुख प्रा. शिवराज गोपाळे. |
|
ओंकार ओक या विद्यार्थ्यास प्रातिनिधिक स्वरुपात अध्यक्षीय भाषणाची प्रत देताना पद्मश्री मधु मंगेश कर्णिक |
|
मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांसह उपस्थित मान्यवर |