Wednesday 14 March 2018

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात अभिनय, नाट्याभिवाचन, संगीत कार्यशाळा उत्साहात

लतिका सावंत, मानसी केळकर-तांबे यांची उपस्थिती

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने अभिनय, नाट्याभिवाचन आणि संगीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत जय मल्हार, गोठ यांसारख्या मालिकांसह ऑल द  बेस्ट या नाटकाचे ४०० हून अधिक प्रयोग करणाऱ्या  प्रसिद्ध अभिनेत्री लतिका सावंत आणि ख्यातनाम गायिका उत्तरा केळकर यांच्या कन्या व एवरीबडी कॅन सिंग या कार्यशाळेच्या संयोजिका मानसी केळकर – तांबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाच्या कॅ. कै. ज. शं. केळकर सभागृहात ही कार्यशाळा पार पडली. यावेळी व्यासपीठावर उपस्थित मार्गदर्शकांसह महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य प्रा. ए. एस. कुलकर्णी, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, मराठी विभागाचे विभागप्रमुखप्रा. शिवराज गोपाळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा. गोपाळे यांनी मराठी विभाग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासानुवर्ती विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. उपस्थित मान्यवरांच्या परिचय डॉ. निधी पटवर्धन यांनी करून दिला. कार्यक्रमाला शुभेच्छा देताना प्रशासकीय उपप्राचार्य प्रा. ए.एस. कुलकर्णी म्हणाले, प्रथितयश कलाकारांनी महाविद्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे महाविद्यालयासाठी अभिमानास्पद आहे. या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी करंबेळकर हिने केले.
कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना लतिका सावंत यांनी अभिनय क्षेत्रातील आपले विविध अनुभव सांगितले. त्याचप्रमाणे अभिनय ओ अभिवचन या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आपली आवड ओळखून समर्पित भावनेने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी आशा अपराध यांच्या आत्मकथनातील काही भागाचे यावेळी अभिवचन केले. त्याला विद्यार्थ्यांनी टाळ्यांनी दाद दिली. एवरीबडी कॅन सिंग या नावाने यशस्वी कार्यशाळा घेणाऱ्या मानसी केळकर – तांबे यांनी गाणे हे मनातून आले तरच ते रसिकांच्या मनापर्यंत पोहोचते असे सांगितले. त्यांनी सादर केलेल्या बहिणाबाई चौधरीच्या माझी माय सरसोती या गीतावर साऱ्यांनीच ठेका धरला. एक्स्प्रेशन आणि वॉईस मॉड्यूलेशन यांच्या आधारे कुणीही चांगले गाणे गाऊ शकेल इतका आत्मविश्वास त्यांनी सर्वांच्या मनात निर्माण केला. कार्यशाळेचे आभारप्रदर्शन डॉ. निधी पटवर्धन यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते.


अभिनय, नाट्याभिवाचन, संगीत कार्यशाळेप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित लतिका सावंत, मानसी केळकर-तांबे, प्रा. ए.एस. कुलकर्णी, डॉ. चित्रा गोस्वामी, प्रा. शिवराज गोपाळे इ.

No comments:

Post a Comment

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

 गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त  दोन विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 'स्...