Wednesday 14 March 2018

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात वाङ्मय मंडळाचे उद्घाटन

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. ७ रोजी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनाला नागपूरस्थित प्रसिद्ध कवी लोकनाथ यशवंत यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे वाङ्मय मंडळ विद्यार्थ्यांच्या साहित्यिक कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी नेहमीच विविध उपक्रम राबवीत असते. या सर्व उपक्रमांचा औपचारिक शुभारंभ प्रसिद्ध कवी लोकनाथ यशवंत यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या ज. शं. केळकर सेमिनार हॉलमध्ये करण्यात आला. यावेळी कवी लोकनाथ यशवंत यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, वाङ्मय मंडळ प्रमुख प्रा. शिवराज गोपाळे, प्रसिद्ध व्यंगचित्रकार संजय मोरे, रत्नागिरीतील प्रथितयश लेखिका रश्मी कशेळकर, सृजन प्रकाशनचे विजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. सुखटणकर यांच्या हस्ते संजय मोरे यांच्या व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला शुभेच्छा देताना डॉ. सुखटणकर म्हणाले की, आजूबाजूला घडणाºया अनेक घटना आपण पाहत असतो. मात्र त्यावर भाष्य करणे प्रत्येकालाच जमत नाही. अशावेळी चांगले कवी आणि व्यंगचित्रकार यांच्या कलेच्या आस्वादातून आपण खूप काही शिकू शकतो. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा. गोपाळे यांनी वाङ्मय मंडळाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कवी लोकनाथ यशवंत यांनी आपला खडतर जीवनप्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडला. ते पुढे म्हणाले की, आपले जीवन कितीही संघर्षपूर्ण असले तरी आपणच प्रयत्नपूर्वक ते सुंदर बनविले पाहिजे. माणूस जे बोलतो आणि प्रत्यक्ष जे वागतो त्यातील तफावत शोधणारी कविताच श्रेष्ठ ठरते. याप्रसंगी कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. गोस्वामी यांनी कवितेचा आस्वाद विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनीही कशाप्रकारे घ्यावा याचा वस्तुपाठच लोकनाथ यशवंत यांनी घालून दिल्याचे नमूद केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्ष कला शाखेची विद्यार्थिनी श्रेया पांचाळ हिने केले. आभार प्रदर्शन प्रा. सायली पिलणकर यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

 गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त  दोन विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 'स्...