Saturday, 17 March 2018

‘मराठी राजभाषा दिन’ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न


गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. २७ फेब्रुवारी हा ‘मराठी राजभाषा दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने प्रा. जयश्री बर्वे यांचे ‘मराठी भाषा: जतन आणि संवर्धन’ या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
            महाविद्यालयाच्या कै. डॉ. ज. शं. केळकर सभागृहात आयोजित कार्यक्रमाचा प्रारंभ कु. पूर्वा चुनेकर हिने सादर केलेल्या ईशस्तवनाने झाली. त्यानंतर कु. निवेदिता कोपरकर हिने कवी कुसुमाग्रज यांची मराठी भाषेचा अभिमान व्यक्त करणारी ‘माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा’ ही कविता सादर केली. तसेच कु. राज्ञी सोनावणे या शालेय विद्यार्थिनीने मराठी भाषा दिनानिमित्त लिहिलेली ‘माझी माय मराठी’ ही कविता कु. सानिका फटकुरे हिने सादर केली. यावेळी व्यासपीठावर इंग्रजी विभागप्रमुख डॉ. अतुल पित्रे उपस्थित होते.
            याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. जयश्री बर्वे म्हणाल्या, भाषेच्या उत्कर्ष हा समाजाचा उत्कर्ष तर भाषेचा ऱ्हास हा समाजाचा ऱ्हास असतो. युनेस्कोच्या अहवालानुसार जगातील सहा हजार भाषांपैकी सुमारे साडेचार हजार भाषा आज ऱ्हासाच्या वाटेवर आहेत. अशावेळी आपल्या भाषेचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी तिचे जाणीवपूर्वक जतन आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. बदलत्या जीवनशैलीनुसार भाषा उणावते आणि दुणावतेही. त्यामुळेच छत्रपती शिवरायांपासून स्वातंत्रवीर सावरकरांपर्यंत अनेकांनी भाषाशुद्धीचे प्रयत्न केले. त्यांची जाण ठेऊन आपण कटाक्षाने अचूक मराठी बोलले पाहिजे. बोलीभाषांबाबत आस्था ठेवली पाहिजे. आपल्या मराठी भाषेला वैभवाच्या शिखरावर घेऊन जायचे असेल तर विद्यार्थ्यांनी मराठी साहित्याचा जाणीवपूर्वक आस्वाद घेतला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.  
            मराठी विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सायली पिलणकर यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

मराठी : जतन... संवर्धन... या विषयावर मार्गदर्शन करताना प्रा. जयश्री बर्वे

मराठी राजभाषा दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित विद्यार्थी

"मनमे है विश्वास" - समीक्षा

द्वितीय वर्ष कला, मराठी अभ्यास पत्रिका क्रमांक २

प्रतिभासंगम राज्यस्तरीय साहित्य संमेलनात विद्यार्थ्यांचे सुयश

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित प्रतिभासंगम या राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलनात मराठी वाङ्मय मंडळाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये कथालेखन स्पर्धेत सबा बंदरी (द्वितीय वर्ष कला) हिने प्रथम आणि शार्दुल रानडे (द्वितीय वर्ष कला) याने उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले. त्याचप्रमाणे लोकशाही : काल, आज, उद्या या विषयावर आयोजित वैचारिक चर्चासत्रातही सबा बंदरी हिने उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले.

कथालेखनाचे प्रथम पारितोषिक मिळवणारी सबा बंदरी.


कथालेखनाचे उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवणारा शार्दुल रानडे 





"जस घडलं तसं" - समीक्षा

द्वितीय वर्ष कला, मराठी अभ्यास पत्रिका क्रमांक 2

Thursday, 15 March 2018

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सोनाली पाटीलचे सुयश

महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे निमित्त रत्नागिरी जिल्हा पोलीस मुख्यालयामार्फत आयोजित क्रीडा महोत्सवात मराठी विभागाच्या पदव्युत्तर पदवी भाग १ या वर्गात शिकणाऱ्या सोनाली पाटील हिने बुद्धिबळ स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला. यावेळी तिला गौरविताना पोलीस अधिकारी.



देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेत मराठी विभागाच्या संघाचा सहभाग

दिनांक १३ ऑगस्ट २०१७ रोजी महाविद्यालयात झालेल्या देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेत मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यामध्ये सहभागी झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे :
१. अभिषेक देवरुखकर
२. पूजा शेट्टी
३. अक्षता बिर्जे
४. समीक्षा पालशेतकर
५. विनायक प्रभूघाटे
६. संजीवनी मांडवकर
७. निधी कशाळीकर
८. श्रुती आंब्रे
९. श्रेया पांचाळ
१०. दिव्या आंबोळकर




पदव्युत्तर पदवी

पदवी प्रथम वर्ष अभ्यासक्रम

पदवी द्वितीय वर्ष अभ्यासक्रम

तृतीय वर्ष परीक्षेत नम्रता शिंदे कला शाखेत प्रथम

शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मध्ये मुंबई विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या तृतीय वर्ष परीक्षेत मराठी संपूर्ण विषयाची विद्यार्थिनी नम्रता उदय शिंदे ८२.१६ टक्के गुण प्राप्त करत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कला शाखेत प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. यानिमित्त तिला प्राचार्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे महाविद्यालयाच्या वार्षिक युवा महोत्सवातही तिचा गौरव करण्यात आला.


नम्रता शिंदे हिला गौरविताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, सोबत कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, मराठी विभागप्रमुख प्रा. शिवराज गोपाळे, डॉ. निधी पटवर्धन, प्रा. सायली पिलणकर


झेप युवा महोत्सवात नम्रता शिंदे हिला भेटवस्तू देऊन गौरवताना वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे सोबत डॉ. निधी पटवर्धन


पदवीदान समारंभप्रसंगी नम्रता शिंदे हिला गौरविताना डॉ. किशोर माणगावकर

Wednesday, 14 March 2018

मुंबई विद्यापीठाच्या पीएच.डी गाईड म्हणून डॉ. निधी पटवर्धन यांना मान्यता


    रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील मराठी विभागात कार्यरत असलेल्या डॉ. निधी पटवर्धन यांना मुंबई विद्यापीठाची 'मराठी' विषयासाठी पीएच.डी गाईड म्हणून मान्यता मिळाली आहे. एम. फील चे दोन विद्यार्थी तर पीएच.डीच्या चार विद्यार्थ्यांना त्या गाईड करणार आहेत. सध्या मुंबई विद्यापीठातील एम. फील. ची कु. रिना शेवाळे ही प्रथम विद्यार्थिनी प्रविष्ट झाली असून  "महात्मा फुले यांच्यावरील  चरित्रात्मक नाटके" या विषयावर डॉ. निधी पटवर्धन मार्गदर्शन करत आहेत.

      डॉ. निधी पटवर्धन यांचे अनेक शोधनिबंध विद्द्वप्रणीत मासिकांमध्ये प्रसिद्ध झाले असून त्यांचा 'पिंटी' हा बालकथासंग्रह स्वा. रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात एम.ए.च्या अभ्यासक्रमात 'बालकुमार साहित्य' या अभ्यासपत्रिकेत समाविष्ट झाला आहे. यावर्षी बडोदा येथे होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात त्यांना दि. १७ फेब्रुवारी रोजी 'कथा व निवेदन' या विषयावर बोलण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. लवकरच त्यांचा  'चिंतनफुले' हा ललितलेख संग्रह स्पर्श प्रकाशनातर्फे प्रकाशित होणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.      

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात वाङ्मय मंडळाचे उद्घाटन

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. ७ रोजी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनाला नागपूरस्थित प्रसिद्ध कवी लोकनाथ यशवंत यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे वाङ्मय मंडळ विद्यार्थ्यांच्या साहित्यिक कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी नेहमीच विविध उपक्रम राबवीत असते. या सर्व उपक्रमांचा औपचारिक शुभारंभ प्रसिद्ध कवी लोकनाथ यशवंत यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या ज. शं. केळकर सेमिनार हॉलमध्ये करण्यात आला. यावेळी कवी लोकनाथ यशवंत यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, वाङ्मय मंडळ प्रमुख प्रा. शिवराज गोपाळे, प्रसिद्ध व्यंगचित्रकार संजय मोरे, रत्नागिरीतील प्रथितयश लेखिका रश्मी कशेळकर, सृजन प्रकाशनचे विजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. सुखटणकर यांच्या हस्ते संजय मोरे यांच्या व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला शुभेच्छा देताना डॉ. सुखटणकर म्हणाले की, आजूबाजूला घडणाºया अनेक घटना आपण पाहत असतो. मात्र त्यावर भाष्य करणे प्रत्येकालाच जमत नाही. अशावेळी चांगले कवी आणि व्यंगचित्रकार यांच्या कलेच्या आस्वादातून आपण खूप काही शिकू शकतो. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा. गोपाळे यांनी वाङ्मय मंडळाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कवी लोकनाथ यशवंत यांनी आपला खडतर जीवनप्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडला. ते पुढे म्हणाले की, आपले जीवन कितीही संघर्षपूर्ण असले तरी आपणच प्रयत्नपूर्वक ते सुंदर बनविले पाहिजे. माणूस जे बोलतो आणि प्रत्यक्ष जे वागतो त्यातील तफावत शोधणारी कविताच श्रेष्ठ ठरते. याप्रसंगी कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. गोस्वामी यांनी कवितेचा आस्वाद विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनीही कशाप्रकारे घ्यावा याचा वस्तुपाठच लोकनाथ यशवंत यांनी घालून दिल्याचे नमूद केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्ष कला शाखेची विद्यार्थिनी श्रेया पांचाळ हिने केले. आभार प्रदर्शन प्रा. सायली पिलणकर यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांचे विशेष व्याख्यान

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने ज्येष्ठ नाटककार, कवी, लेखक प्रेमानंद गज्वी यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. 
महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं. केळकर सभागृहात दि. २८ जून रोजी हे व्याख्यान झाले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, मराठी विभागाचे विभागप्रमुख प्रा. शिवराज गोपाळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा. गोपाळे यांनी प्रेमानंद गज्वी यांच्या मराठी नाट्यसृष्टीतील योगदानाचा आढावा घेतला. 
उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पे्रमानंद गज्वी यांनी बंगालमधील यक्षगानपासून प्रेरीत मराठी नाटकांच्या प्रारंभापासून अलीकडील नाटकांपर्यंतचा लेखाजोखा मांडला. ते पुढे म्हणाले, समाजातील सर्वच घटक एकमेकांशी जोडलेले आहेत. त्यामुळेच साहित्याच्या क्षेत्रात यातील कोणताही घटक वजा करणे योग्य ठरणार नाही. आज मराठी साहित्याला स्वतंत्र नाट्यनिर्मितीची आवश्यकता आहे. आंतरराष्टÑीय स्तरावर घडणाºया विविध घडामोडींचे संदर्भ मराठी साहित्यात यायला हवेत. तरच मराठी साहित्य समृद्ध होईल. आज जे विकते तेच पिकविण्याकडे निर्मात्यांचा कल आहे. मात्र असे करताना सौंदर्य कुरूपतेच्या सीमा ओलांडणार नाही याचे भान राखले पाहिजे, असे परखड मतही गज्वी यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना डॉ. किशोर सुखटणकर यांनी विविध दशकातील नाटकांचे आणि बदलत्या संदर्भांचे बहुआयामी मार्गदर्शन केल्याबद्दल प्रेमानंद गज्वी यांचे आभार मानले. तसेच महाविद्यालयात अभिजात नाटकांचा महोत्सव साजरा करण्याचा मनोदय व्यक्त केला. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते. 

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात अभिनय, नाट्याभिवाचन, संगीत कार्यशाळा उत्साहात

लतिका सावंत, मानसी केळकर-तांबे यांची उपस्थिती

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने अभिनय, नाट्याभिवाचन आणि संगीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत जय मल्हार, गोठ यांसारख्या मालिकांसह ऑल द  बेस्ट या नाटकाचे ४०० हून अधिक प्रयोग करणाऱ्या  प्रसिद्ध अभिनेत्री लतिका सावंत आणि ख्यातनाम गायिका उत्तरा केळकर यांच्या कन्या व एवरीबडी कॅन सिंग या कार्यशाळेच्या संयोजिका मानसी केळकर – तांबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाच्या कॅ. कै. ज. शं. केळकर सभागृहात ही कार्यशाळा पार पडली. यावेळी व्यासपीठावर उपस्थित मार्गदर्शकांसह महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य प्रा. ए. एस. कुलकर्णी, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, मराठी विभागाचे विभागप्रमुखप्रा. शिवराज गोपाळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा. गोपाळे यांनी मराठी विभाग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासानुवर्ती विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. उपस्थित मान्यवरांच्या परिचय डॉ. निधी पटवर्धन यांनी करून दिला. कार्यक्रमाला शुभेच्छा देताना प्रशासकीय उपप्राचार्य प्रा. ए.एस. कुलकर्णी म्हणाले, प्रथितयश कलाकारांनी महाविद्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे महाविद्यालयासाठी अभिमानास्पद आहे. या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी करंबेळकर हिने केले.
कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना लतिका सावंत यांनी अभिनय क्षेत्रातील आपले विविध अनुभव सांगितले. त्याचप्रमाणे अभिनय ओ अभिवचन या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आपली आवड ओळखून समर्पित भावनेने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी आशा अपराध यांच्या आत्मकथनातील काही भागाचे यावेळी अभिवचन केले. त्याला विद्यार्थ्यांनी टाळ्यांनी दाद दिली. एवरीबडी कॅन सिंग या नावाने यशस्वी कार्यशाळा घेणाऱ्या मानसी केळकर – तांबे यांनी गाणे हे मनातून आले तरच ते रसिकांच्या मनापर्यंत पोहोचते असे सांगितले. त्यांनी सादर केलेल्या बहिणाबाई चौधरीच्या माझी माय सरसोती या गीतावर साऱ्यांनीच ठेका धरला. एक्स्प्रेशन आणि वॉईस मॉड्यूलेशन यांच्या आधारे कुणीही चांगले गाणे गाऊ शकेल इतका आत्मविश्वास त्यांनी सर्वांच्या मनात निर्माण केला. कार्यशाळेचे आभारप्रदर्शन डॉ. निधी पटवर्धन यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते.


अभिनय, नाट्याभिवाचन, संगीत कार्यशाळेप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित लतिका सावंत, मानसी केळकर-तांबे, प्रा. ए.एस. कुलकर्णी, डॉ. चित्रा गोस्वामी, प्रा. शिवराज गोपाळे इ.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात स्वयंरोजगार शिबिर

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा मराठी विभाग आणि खादी ग्रामोद्योग आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वयंरोजगार शिबिराचे उदघाटन दि. 9 डिसेंबर 2017 रोजी संपन्न झाले. या शिबिराकरिता प्रतिथयश व्यावसायिक उदय लोध उदघाटक म्हणून लाभले होते.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा मराठी विभाग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच वैविध्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करत असतो. याच अनुषंगाने खादी ग्रामोद्योग आयोगाच्या सहकार्यातून महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात स्वयंरोजगार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उदघाटन प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, प्रसिद्ध उद्योजक उदय लोध, मराठी विभागप्रमुख प्रा. शिवराज गोपाळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शिवराज गोपाळे यांनी केले. उपस्थित प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना उदय लोध म्हणाले की, स्वयंरोजगार करत असताना कोणत्याही कमाला कमी लेखू नका. आज महाराष्ट्रात कौशल्य विकासाचे 600 तर राष्ट्रीय स्तरावर 21 हजार प्रकार आहेत. त्यांची माहिती घेण्याची गरज आहे. स्वयंरोजगार आपल्याला आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळवून देतो. जेव्हा आपण स्वतः घडत असतो, तेव्हा एकप्रकारे आपण समाज आणि देश घडवत असतो. याचे भान ठेवून आजच्या तरुणाईने स्वयंरोजगाराकडे वळले पाहिजे.
अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर म्हणाले की, आज तरुण आपल्या सोयीच्या परिघाबाहेर जाण्यास तयार नसतात. मात्र ही मानसिकता बदलली असता आज स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आपण आपला सर्वांगीण विकास साधू शकतो. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसाठी अनेक व्यवसाय संधी सुचवल्या तसेच कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी हा अभिनव उपक्रम राबविल्याबद्दल मराठी विभागाचे अभिनंदन केले.
यावेळी शिबिराच्या औचित्याने घेण्यात आलेल्या वादविवाद आणि निबंध स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. स्वयंरोजगाराशिवाय पर्याय नाही या विषयावर घेण्यात आलेल्या वादविवाद स्पर्धेत तैबा बोरकर, मैत्रेयी बांदेकर यांनी प्रथम, ऐश्वर्या आचार्य, नारायणी शहाणे यांनी द्वितीय तर ऋषिकेश लांजेकर, अजिंक्य प्रभुदेसाई यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तसेच उद्योजक व्हा या विषयावर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत नम्रता शिंदे प्रथम, पूर्वा चुनेकर आणि समीक्षा पालशेतकर विभागून द्वितीय तर कोमल कांबळे तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. सर्व विजेत्यांना खादी ग्रामोद्योग आयोगाच्या वतीने पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निधी पटवर्धन यांनी केले.
यानंतर 4 सत्रांमध्ये झालेल्या स्वयंरोजगार शिबिरामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. यातील पहिल्या सत्रात मँगो इव्हेंट्सचे अभिजित गोडबोले यांनी इव्हेंट मॅनेजमेंट याविषयी माहिती दिली. दुसऱ्या सत्रात कोकणातील फळप्रक्रिया : मूल्यवर्धन या विषयांतर्गत श्रीधर ओगले यांनी कोकणातील फळप्रक्रिया आणि त्यांचे मूल्यवर्धन, त्याद्वारे निर्माण होणाऱ्या रोजगार संधी याबाबत अभ्यासपूर्ण विवेचन केले. तिसऱ्या सत्रात स्वप्नपूर्ती इन्स्टिट्यूटच्या नीता माजगावकर यांनी मेकअप आणि हेअरस्टाईल याबाबत मार्गदर्शन केले. चौथ्या सत्रांमध्ये आपला आवाज आपल्या स्वयंरोजगाराचे साधन कशाप्रकारे बनू शकतो याबाबत अभिनेत्री लतिका सावंत यांनी विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा जागवली. या स्वयंरोजगार शिबिरासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.










प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास, वस्तुनिष्ठ प्रश्न

Tuesday, 13 March 2018

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात रंगला विंदांच्या कवितांचा 'स्वच्छंद' कार्यक्रम

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त गोगटे जोगळेकर महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान निर्मित विंदांच्या समग्र साहित्य निर्मितीचे दर्शन घडविणारा 'स्वच्छंद' हा कार्यक्रम दि. ११ऑक्टोबर २०१७  रोजी सकाळी १० वाजता महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात सादर झाला.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या औचित्याने राज्य मराठी विकास संस्था प्रायोजित व वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान निर्मित स्वच्छंद या कार्यक्रमाचे आयोजन गोगटे जोगळेकर महाविद्यालयात करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे वामन पंडीत, अनिल फराकटे, प्रसाद घाणेकर,माधव गावकर आणि हर्षदा दीक्षित आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाची संहिता डॉ. विद्याधर करंदीकर यांची तर निर्मिती संकल्पना  वामन पंडित यांची होती. यासाठी संगीत संयोजन माधव गावकर यांचे होते. शेक्सपिअरच्या किंग लिअरचे भाषांतर करताना त्यातील पंचखंडी प्रवेशाचे विंदांनी चतुष्खंडी मुक्तछंदात रुपांतर केले. त्या प्रवेशाचे वामन पंडित यांनी केलेले अभिवाचन सर्वांनाच भावले. यासह विंदांच्या गणेशस्तवन, ट्रंक, तेच ते, मानवांनो आत या रे यांसारख्या लोकप्रिय कविता, बालकविता, चुटके, त्यांच्या लघुनिबंधामधील आम्रयोग, अमृतानुभवातील ओव्या, आततायी अभंग या कार्यक्रमात सादर झाले. त्याचप्रमाणे विंदांनी त्यांच्या अष्टदर्शनमधून सात पाश्चात्य तत्वज्ञ आणि भारतीय तत्वज्ञ चार्वाक यांचे जे दर्शन घडविले आहे. त्याची झलकही या कार्यक्रमात पहायला मिळाली. या सुरेख सादरीकरणाला रसिकांच्या टाळ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निधी पटवर्धन यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी आणि रत्नागिरी शहरातील रसिक बहुसंख्येने उपस्थित होते.


वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे वामन पंडित यांचे स्वागत करताना डॉ. किशोर सुखटणकर

विंदा करंदीकर यांच्या कवितांचे सादरीकरण करताना वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे कलाकार

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा २०१६


प्रमुख व्याख्याते ऍड. विजय कुवळेकर यांचे स्वागत करताना कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, सोबत मराठी विभागप्रमुख प्रा. शिवराज गोपाळे 

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ऍड. विजय कुवळेकर


कार्यक्रमासाठी उपस्थित विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्ग 

Monday, 12 March 2018

सामंजस्य करारांतर्गत चौगुले महाविद्यालय, गोवा येथे भेट २०१४-१५

सामंजस्य करारांतर्गत शैक्षणिक भेटी प्रसंगी सहभागी प्राध्यापक वर्ग 

मुलगी झाली हो ही नाटिका सादर करताना विद्यार्थिनी 

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिले मराठी विकिपीडियासाठी योगदान

राज्य मराठी विकास संस्था आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून मराठी विकिपीडिया विषयक राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या संगणक कक्षात दि. १० जानेवारी २०१७ रोजी घेण्यात आलेल्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी विकिपीडिया या डिजीटल ज्ञानकोशाचा परिचय करून घेतला. तसेच त्यात संपादनही केले.
आंतरजालावर माहितीचा प्रमुख स्त्रोत म्हणून विकिपीडियाची ओळख आहे. संगणक आणि इंटरनेट यांच्या सहाय्याने समृद्ध होत असलेली युवा पिढी आपली बौद्धिक गरज भागवण्यासाठी आज विकिपीडियाचा आधार घेताना दिसते. उपयुक्त सदर्भ आणि विश्वासार्ह माहिती म्हणजे विकिपीडिया असे समीकरणच आता रूढ होऊ लागले आहे. आज विकिपीडियावरील ज्ञानकोश पाहता इंग्रजीतून विविध विषयांचे सुमारे ५० लाख दुवे उपलब्ध आहेत. मात्र मराठी विकिपीडियावरील दुव्यांची संख्या केवळ ५० हजार इतकी आहे. त्यामुळे मराठी विकिपीडिया अधिक समृद्ध व्हावा, त्यायोगे मराठी अभ्यासकांना त्याचा अधिकाधिक वापर करता यावा,विद्यार्थ्यांच्या नैपुण्याचा विकास साधावा या उद्देशाने  राज्य मराठी विकास संस्थेच्या सहकार्याने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, कला शाखेच्या उपप्राचार्य डॉ. चित्रा गोस्वामी, मराठी विभागप्रमुख शिवराज गोपाळे, साधनव्यक्ती म्हणून डॉ. आर्या जोशी, महाविद्यालयाचा विद्यार्थी सचिव तन्मय सावंत आदी उपस्थित होते.
या उपक्रमात महाविद्यालयाच्या सर्व विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त  सहभाग  नोंदविला. या कार्यशाळेअंतर्गत डॉ. जोशी यांनी विकिपीडियाच्या उपयोजिततेबाबत आणि त्यावरील संपादनाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानुसार विद्यार्थ्यांनी स्वतः विकिपीडियावर  विविध विषयांवर  लेखन करून आंतरजाल समृद्ध केले. याप्रसंगी अमेरिकास्थित मराठी विकिपीडियाचे प्रचारक अभय नातू यांनी भ्रमणध्वनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जागतिक पातळीवर मराठीचे स्थान उंचावण्यासाठी युवा पिढीने मराठी विकिपीडियावर रोज किमान ५ संपादने करण्याचे आवाहन केले. तसेच हा अभिनव उपक्रम राबविल्याबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मराठी विभागातर्फे डॉ. निधी पटवर्धन, प्रा. सायली पिलणकर, संगणकशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख प्रा. अनुजा घारपुरे व त्यांचे सहकारी, तांत्रिक सहाय्यक श्री. राजपूत यांचे सहकार्य लाभले.




मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

 गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त  दोन विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 'स्...