Wednesday, 27 February 2019

गो. जो. महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाचे घवघवीत यश

       राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग आयोजित साडवली (देवरूख) झालेल्या एकपात्री अभिनय स्पर्धा व काव्यवाचन स्पर्धेत जिल्हास्तरावर गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळाच्या पाच विद्यार्थ्यांनी पारितोषिके पटकावली. काव्यवाचन स्पर्धेत विजय सुतार आणि एकपात्री अभिनय स्पर्धेत स्मितल चव्हाण यांनी प्रथम क्रमांक पटकावला. हे दोन विद्यार्थी दि. १ व २ फेब्रुवारी रोजी राज्यस्तरावर होणाऱ्या महाअंतिम फेरीत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रतिनिधीत्व करतील.
     
      २०१८-१९ हे वर्ष कवी, नाटककार राम गणेश गडकरी यांचे स्मृतिशताब्दी वर्ष; तर महाकवी ग.दि. माडगुळकर आणि सिद्धहस्त लेखक पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिम्मित्ताने या तीन साहित्यिकांच्या लेखनावर आधारित राज्य मराठी विकास संस्थेने राज्य पातळीवर या दोन्ही स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धा शालेय व महाविद्यालयीन गटात घेण्यात येत आहेत. दि. २१ जानेवारी रोजी साडवली (देवरूख) येथे संपन्न झालेल्या महाविद्यालयीन जिल्हास्तर स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाच्या पुढील  विद्यार्थ्यांनी बक्षिसांची कमाई  केली. काव्यवाचन स्पर्धा - विजय सुतार (प्रथम) (रू.3000/-  व पुस्तक), अस्मिता गोखले (द्वितीय) (रू. 2500/-  व पुस्तक), एकपात्री अभिनय स्पर्धा - प्रथम - स्मितल चव्हाण (3000/- व पुस्तक),चतुर्थ - दीप्ती वहाळकर (1500/- व पुस्तक),पंचम- श्रेया जोशी (1000/- व पुस्तक) अशी पारितोषिके प्राप्त केली.
      विजय सुतार याने ग.दि. माडगुळकर यांची 'जोगिया' हे कविता सादर केली. अस्मिता गोखले हिने गोविंदाग्रजांची 'प्रेम आणि मरण' ही कविता सादर केली. तर स्मितल चव्हाण हिने पु. ल. देशपांडे यांच्या 'सुंदर मी होणार' मधील दीदीची भूमिका साकारली. दीप्ती वहाळकर हिने पु. ल. देशपांडे यांच्या 'घरगुती भांडणे' या विनोदी लेखावर अभिनय केला. श्रेया जोशी हिने पु. ल. देशपांडे यांची 'फुलराणी' साकारली. या विद्यार्थ्यांसाठी मराठी वाङ्मय मंडळाने कसून मेहनत घेतली होती. यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर आणि संस्थेच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन यांनी अभिनंदन केले आहे.

'रंगवैखरी' महाअंतिम फेरीत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाला पावणेदोन लाखाची सहा पारितोषिके

      महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेतर्फे आयोजित रंगवैखरी (पर्व दुसरे) या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी ६ जानेवारी रोजी मुंबई येथे रवींद्र नाट्यमंदिरात प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात पार पडली. महाराष्ट्र आणि बेळगाव केंद्रातून विभागीय अंतिम फेरीत निवडून आलेल्या सात संघांच्या नाटयाविष्कारामध्ये चुरस रंगली. रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाने बसवलेल्या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगावर आधारित  'अधिक देखणे तरी' या एकांकिकेने सांघिक द्वितीय पारितोषिक पटकावत पाच वैयक्तिक बक्षिसे खेचून आणली. रुपये सव्वा लाख रोख, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन संघाला गौरविण्यात आले. या स्पर्धेला नाट्यसंमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी, नंदेश उमप, शर्वरी जमेनीस, परेश मोकाशी, रेखा इनामदार-साने, शशांक शेंडे हे परीक्षक म्हणून लाभले. यंदाच्या रंगवैखरी साठी 'नव्या वाटा' हा विषय देण्यात आला होता.
      या स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालाच्या  विनायक पांचाळ व श्वेत भागवत यांना सर्वोत्कृष्ट शिल्पकलेचे रु.१५००० आणि मानचिन्ह असे प्रथम पारितोषिक मिळाले. हृषीकेश वैद्य याला सर्वोत्कृष्ट अभिनय (पुरुष) द्वितीय रु.१०,००० आणि मानचिन्ह, श्रेया जोशी हिला सर्वोत्कृष्ट अभिनय (स्त्री) द्वितीय रु.१०,००० आणि मानचिन्ह, निरंजन सागवेकर याला सर्वोत्कृष्ट चित्र रु.१०,००० आणि मानचिन्ह, द्वितीय आणि प्रसन्न खानविलकर याला सर्वोत्कृष्ट लेखक, द्वितीय पारितोषिक रु.१०,००० आणि मानचिन्ह देऊन मान्यवरांनी सत्कार केला. या एकांकिकेसाठी मराठी वाङ्मय मंडळाच्या  डॉ. निधी पटवर्धन यांचे मार्गदर्शन लाभले.
        गोगटे- जोगळेकर महाविद्यालायच्या राधाबाई शेट्ये सभागृहात 'मराठी भाषा संवर्धन पंधरावड्या निमित्त या एकांकिकेचे सादरीकरण झाले. या कार्यक्रमाला र.ए. सोसायटीच्या अध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, सचिव सतीश शेवडे, संस्थेचे पदाधिकारी डॉ. कल्पना मेहता, अॅड. प्राची जोशी, उदय लोध, राजन मलुष्टे, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, मराठी वाङ्मय मंडळ प्रमुख प्रा. शिवराज गोपाळे, प्राध्यापक वर्ग व महाविद्यालतील कर्मचारी आणि विदयार्थी उपस्थित होते. मान्यवरांनी विजेत्या संघाचे कौतुक केले.


Saturday, 6 October 2018

कादंबरीकार कृष्णात खोत यांच्या हस्ते वाङ्मय मंडळाचे उदघाटन

जनतेचा खरा आधार साहित्यिक असतो. जनतेच्या पाठी नेहमी लेखक असतो; तो सामान्यांचे जगणे मांडतो आणि असे साहित्य जगण्याला आधार देते.असे उद्गार प्रसिद्ध साहित्यिक श्री. कृष्णात खोत यांनी काढले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वाङ्मय मंडळाच्या उदघाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत साहित्याची निर्मिती प्रक्रिया, साहित्यिक निर्मितीविश्वातला त्यांच्या प्रवास विद्यार्थ्यांना सविस्तरपणे कथन केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रसिद्ध साहित्यिक कृष्णात खोत यांच्या हस्ते साहित्य सौरभया भित्तिपत्रकाचे अनावरण करण्यात आले. यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा. गोपाळे यांनी महाविद्यालयाच्या वाङ्मय मंडळाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेऊन नियोजित कार्यक्रमांची रूपरेषा विशद केली. याप्रसंगी विद्यापीठ युवा संसद स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांकाची पारितोषिव विजेती विद्यार्थींनी कु. प्रिया पेडणेकर आणि मार्गदर्शक तसेच महाविद्यालयाच्या वक्तृत्व आणि वादविवाद समितीचे समन्वयक प्रा. जयंत अभ्यंकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महाविद्यालयाचे वाङ्मय मंडळ विविध साहित्यविषयक उपक्रम नेहमी आयोजित करत असते. या सर्व उपक्रमांचा औपचारिक शुभारंभ प्रसिद्ध कादंबरीकार कृष्णात खोत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, वाङ्मय मंडळ प्रमुख प्रा. शिवराज गोपाळे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन जागृती महाडिक या विद्यार्थिनीने केले. सदर कार्यक्रमाला प्राध्यापक आणि विद्यार्थी यांची लक्षणीय उपस्थिती लाभली होती.

वाङ्मय मंडळाच्या साहित्य सौरभ या भित्तीपत्रकाबाबत माहिती घेताना कादंबरीकार कृष्णात खोत 


प्रा. जयंत अभ्यंकर यांना गौराविताना श्री. खोत सोबत उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये तसेच वाङ्मय मंडळ प्रमुख प्रा. शिवराज गोपाळे 

उपस्थितांशी संवाद साधताना कादंबरीकार कृष्णात खोत 


Thursday, 27 September 2018

मा. विनय धुमाळे यांनी केले मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

मराठी विभागातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ख्यातनाम निर्माते आणि मुंबई दूरदर्शनच्या स्थापनेतील अग्रणी मा. विनय धुमाळे

Thursday, 6 September 2018

मराठी विभागाच्या 'लेखक आपल्या भेटीला' कार्यक्रमांतर्गत पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचे व्याख्यान

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने दिनांक २ सप्टेंबर २०१८ रोजी 'लेखक आपल्या भेटीला' कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी ख्यातनाम साहित्यिक आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, प्रसिद्ध कवी महेश केळुस्कर, शशिकांत तिरोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, प्रसिद्ध कवी महेश केळुस्कर, शशिकांत तिरोडकर यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, मराठी विभागप्रमुख प्रा. शिवराज गोपाळे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष आणि रत्नागिरीच्या सांस्कृतिक क्षेत्रातील सक्रीय व्यक्तिमत्व प्रकाश दळवी यांचीही उपस्थिती लाभली. कार्यक्रमादरम्यान महेश केळुस्कर आणि शशिकांत तिरोडकर यांनी आपल्या कवितांचे अभिवाचन केले. महाविद्यालयीन जीवनातील तारुण्यसुलभ भावना व्यक्त करणाऱ्या महेश केळुस्कर यांच्या कवितांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तर शशिकांत तिरोडकर यांच्या 'पत्र' कवितेने विद्यार्थ्यांना भावूकही केले.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी महाविद्यालयाशी असणाऱ्या त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त विंदा करंदीकर गोगटे जोगळेकर महाविद्यालयात अध्यापक असताना कवी आरती प्रभूंसह त्यांची घेतलेली भेट, मॅट्रीकच्या परीक्षेचे प्रसंग, लेखक म्हणून प्रस्थापित होईपर्यंत वाट्याला आलेला संघर्ष त्यांनी विद्यार्थ्यांसमोर कथन केला.विद्यार्थ्यांना लेखनाविषयी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, नव्या लेखकांनी आपल्या अनुभवातून, आपल्या आजूबाजूच्या वास्तव जीवनातले संकेत वापरून लिहायला हवे. जेव्हा असे अस्सल जीवनानुभव तुमच्या लेखनात येतील तेव्हाच खऱ्या अर्थाने ती तुमची नवनिर्मिती असेल.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. त्याचप्रमाणे महाविद्यालयाची वैभवशाली परंपरा उत्तरोत्तर उन्नत ठेवण्याची ग्वाही दिली. याप्रसंगी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविताना पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी केलेल्या भाषणाच्या प्रती विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय सुतार याने केले. या कार्यक्रमाकरिता महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, यावेळी मंचावर उपस्थित प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, कवी महेश केळुस्कर, कवी शशिकांत तिरोडकर, मराठी विभागप्रमुख प्रा. शिवराज गोपाळे.

ओंकार ओक या विद्यार्थ्यास प्रातिनिधिक स्वरुपात अध्यक्षीय भाषणाची प्रत देताना पद्मश्री मधु मंगेश कर्णिक 

मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांसह उपस्थित मान्यवर 

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

 गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त  दोन विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 'स्...