Wednesday 27 February 2019

गो. जो. महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाचे घवघवीत यश

       राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग आयोजित साडवली (देवरूख) झालेल्या एकपात्री अभिनय स्पर्धा व काव्यवाचन स्पर्धेत जिल्हास्तरावर गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळाच्या पाच विद्यार्थ्यांनी पारितोषिके पटकावली. काव्यवाचन स्पर्धेत विजय सुतार आणि एकपात्री अभिनय स्पर्धेत स्मितल चव्हाण यांनी प्रथम क्रमांक पटकावला. हे दोन विद्यार्थी दि. १ व २ फेब्रुवारी रोजी राज्यस्तरावर होणाऱ्या महाअंतिम फेरीत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रतिनिधीत्व करतील.
     
      २०१८-१९ हे वर्ष कवी, नाटककार राम गणेश गडकरी यांचे स्मृतिशताब्दी वर्ष; तर महाकवी ग.दि. माडगुळकर आणि सिद्धहस्त लेखक पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिम्मित्ताने या तीन साहित्यिकांच्या लेखनावर आधारित राज्य मराठी विकास संस्थेने राज्य पातळीवर या दोन्ही स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धा शालेय व महाविद्यालयीन गटात घेण्यात येत आहेत. दि. २१ जानेवारी रोजी साडवली (देवरूख) येथे संपन्न झालेल्या महाविद्यालयीन जिल्हास्तर स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाच्या पुढील  विद्यार्थ्यांनी बक्षिसांची कमाई  केली. काव्यवाचन स्पर्धा - विजय सुतार (प्रथम) (रू.3000/-  व पुस्तक), अस्मिता गोखले (द्वितीय) (रू. 2500/-  व पुस्तक), एकपात्री अभिनय स्पर्धा - प्रथम - स्मितल चव्हाण (3000/- व पुस्तक),चतुर्थ - दीप्ती वहाळकर (1500/- व पुस्तक),पंचम- श्रेया जोशी (1000/- व पुस्तक) अशी पारितोषिके प्राप्त केली.
      विजय सुतार याने ग.दि. माडगुळकर यांची 'जोगिया' हे कविता सादर केली. अस्मिता गोखले हिने गोविंदाग्रजांची 'प्रेम आणि मरण' ही कविता सादर केली. तर स्मितल चव्हाण हिने पु. ल. देशपांडे यांच्या 'सुंदर मी होणार' मधील दीदीची भूमिका साकारली. दीप्ती वहाळकर हिने पु. ल. देशपांडे यांच्या 'घरगुती भांडणे' या विनोदी लेखावर अभिनय केला. श्रेया जोशी हिने पु. ल. देशपांडे यांची 'फुलराणी' साकारली. या विद्यार्थ्यांसाठी मराठी वाङ्मय मंडळाने कसून मेहनत घेतली होती. यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर आणि संस्थेच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन यांनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

 गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त  दोन विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 'स्...