Wednesday 27 February 2019

'रंगवैखरी' महाअंतिम फेरीत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाला पावणेदोन लाखाची सहा पारितोषिके

      महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेतर्फे आयोजित रंगवैखरी (पर्व दुसरे) या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी ६ जानेवारी रोजी मुंबई येथे रवींद्र नाट्यमंदिरात प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात पार पडली. महाराष्ट्र आणि बेळगाव केंद्रातून विभागीय अंतिम फेरीत निवडून आलेल्या सात संघांच्या नाटयाविष्कारामध्ये चुरस रंगली. रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाने बसवलेल्या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगावर आधारित  'अधिक देखणे तरी' या एकांकिकेने सांघिक द्वितीय पारितोषिक पटकावत पाच वैयक्तिक बक्षिसे खेचून आणली. रुपये सव्वा लाख रोख, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन संघाला गौरविण्यात आले. या स्पर्धेला नाट्यसंमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी, नंदेश उमप, शर्वरी जमेनीस, परेश मोकाशी, रेखा इनामदार-साने, शशांक शेंडे हे परीक्षक म्हणून लाभले. यंदाच्या रंगवैखरी साठी 'नव्या वाटा' हा विषय देण्यात आला होता.
      या स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालाच्या  विनायक पांचाळ व श्वेत भागवत यांना सर्वोत्कृष्ट शिल्पकलेचे रु.१५००० आणि मानचिन्ह असे प्रथम पारितोषिक मिळाले. हृषीकेश वैद्य याला सर्वोत्कृष्ट अभिनय (पुरुष) द्वितीय रु.१०,००० आणि मानचिन्ह, श्रेया जोशी हिला सर्वोत्कृष्ट अभिनय (स्त्री) द्वितीय रु.१०,००० आणि मानचिन्ह, निरंजन सागवेकर याला सर्वोत्कृष्ट चित्र रु.१०,००० आणि मानचिन्ह, द्वितीय आणि प्रसन्न खानविलकर याला सर्वोत्कृष्ट लेखक, द्वितीय पारितोषिक रु.१०,००० आणि मानचिन्ह देऊन मान्यवरांनी सत्कार केला. या एकांकिकेसाठी मराठी वाङ्मय मंडळाच्या  डॉ. निधी पटवर्धन यांचे मार्गदर्शन लाभले.
        गोगटे- जोगळेकर महाविद्यालायच्या राधाबाई शेट्ये सभागृहात 'मराठी भाषा संवर्धन पंधरावड्या निमित्त या एकांकिकेचे सादरीकरण झाले. या कार्यक्रमाला र.ए. सोसायटीच्या अध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, सचिव सतीश शेवडे, संस्थेचे पदाधिकारी डॉ. कल्पना मेहता, अॅड. प्राची जोशी, उदय लोध, राजन मलुष्टे, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, मराठी वाङ्मय मंडळ प्रमुख प्रा. शिवराज गोपाळे, प्राध्यापक वर्ग व महाविद्यालतील कर्मचारी आणि विदयार्थी उपस्थित होते. मान्यवरांनी विजेत्या संघाचे कौतुक केले.


No comments:

Post a Comment

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

 गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त  दोन विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 'स्...