Sunday, 19 January 2020

नारायण सुर्वे यांच्या चार शब्द या कवितेचा आशय


           नारायण सुर्वे हे मराठीतील पहिले आणि शेवटचे कामगार कवी म्हणून ओळखले जातात. मुंबईतील कापड गिरण्या, तेथील कामगार, त्यांचे खडतर जीवन, महानगरातील दारिद्र्य, विषमता यांना त्यांच्या कवितेत महत्त्वाचे स्थान होते. कारखानदार आणि सत्ताधारी विरुद्ध कष्टकरी कामगार यांच्यातील वर्गसंघर्ष त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी आहे. कार्ल मार्क्स यांच्या वर्गसिद्धांताप्रमाणे कला या नेहमी आहे रे (भांडवलशहा आणि सत्ताधारी) वर्गाच्या धार्जिण्या असतात. त्यांवर नेहमी आहे रे वर्गाच्या विचारांची छाया जाणवत असते. मराठी साहित्यही याला अपवाद नाही. साहित्याच्या या प्रवृत्तीच्या विरोधात जाऊन शोषितांची, कष्टकऱ्यांची जीवनव्यथा नारायण सुर्वे यांनी  आपल्या कवितेत मांडली. आपल्याला कवितेची स्फूर्ती कशी मिळाली आणि आपल्या कवितेचे स्वरूप कशाप्रकारचे आहे हे त्यांनी आपल्या चार शब्द या कवितेत स्पष्ट केले आहे.
          नारायण सुर्वे म्हणतात की, आमच्या रोजी-रोटीचा, दैनंदिन जीवनाच्या संघर्षाचा सवाल नेहमीचाच आहे. आमच्या हातावर आमचे पोट आहे. कधी कारखान्यात काम मिळते, कधी संप होतो, कामावरून कमी केले जाते, तरीही आम्ही कामगार तळपत्या तलवारीप्रमाणे तडफदार आहोत. आमच्यावर होणाऱ्या अन्यायाची आम्हाला जाणीव आहे. त्याविरुद्ध आम्ही संघर्ष करत आहोत. मात्र आमचे हे जीवन कधीच इथल्या सारस्वतांनी (साहित्यिकांनी) आपल्या लेखनात चितारले नाही. त्यामुळे साहित्यिकांनो आता मी तुमच्या आशयविश्वात आम्हा शोषितांची व्यथा मांडून थोडा गुन्हाच करणार आहे असेही ते उपरोधाने म्हणतात.
          आपल्या कवितांच्या आशयात काय आहे हे सांगताना ते म्हणतात की या जीवनात आम्ही जे सहन केलं, जे पाहिलं, निरीक्षणातून ज्या गोष्टींचे अंदाज बांधले ते तर माझ्या कवितेत आहेच मात्र त्याच्या जोडीने कष्टकरी वर्ग म्हणून माझ्या जगाची वेदना आणि स्वेदगंधही त्यात आहे. या खडतर मार्गावर चालताना कधी चुकलो, काही गोष्टी गमावल्या तर काही नवीन शिकलोही आहे. जसं आयुष्य मी जगलो अगदी तसंच आयुष्य मी माझ्या कवितेत शब्दबद्ध करणार आहे.
          माणसाला जगण्यासाठी अन्न गरजेचे असतेच, मात्र त्याला अन्नाबरोबरच आत्मसन्मानही हवा असतो याची जाणीवही आता आम्हाला झाली आहे. त्यामुळेच आता माझं विश्व, माझे कामगार बंधू नव्या जगासाठी, परिवर्तनासाठी सिद्ध होत आहेत. अन्यायापुढे झुकणाऱ्या वृत्तीला, गुलामीला नष्ट करण्यासाठी आता माझे शब्दच शस्त्रे परजणार आहेत. आमच्यावर युगानुयुगे अन्याय होत आलेला आहे. मात्र आजवर हा अन्याय आम्ही सहन केला म्हणून तुम्ही बेसावध राहू नका. ही शांतता वादळापूर्वीची शांतता आहे. त्यापुढे एक भीषण संघर्षाला सुरूवात होणार असल्याचा संकेत कवी आपल्या कवितेतून देत आहे. अशाप्रकारे चार शब्द हे नारायण सुर्वे यांची कविता वर्गसंघर्षांमुळे कष्टकऱ्यांच्या शोषणाला अधोरेखित करते आणि त्याचप्रमाणे त्यांना आलेल्या आत्मभानाची जाणीवही स्पष्ट करते.

नोटच्या PDF साठी खालील दुव्यावर टिचकी द्या.
https://drive.google.com/open?id=1fqGf_x6phY5tt7DTuGWF_N2rMfvxvTod

Tuesday, 14 January 2020

आविष्कार संशोधन महोत्सवात मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

          आविष्कार संशोधन महोत्सवाच्या विभागीय फेरीमध्ये मराठी विभागाच्या पदवी विभागातील स्वरूप काणे आणि साक्षी पंडित तसेच पदव्युत्तर विभागातील निवेदिता कोपरकर आणि श्रेया पाध्ये यांनी सहभाग घेतला.
          आविष्कार संशोधन महोत्सवाची निवड फेरी म्हणून महाविद्यालय स्तरावर शोधवेध संशोधन महोत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांनाच आविष्कार स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली. या संशोधन महोस्तवासाठी पदवी स्तरावर स्वरूप काणे आणि साक्षी पंडित यांनी "रत्नागिरी जिल्ह्यातील दालदी आणि भंडारी समाजातील अंत्यविधीची भाषा" हा विषय निवडला होता. त्यांना डॉ. निधी पटवर्धन यांनी मार्गदर्शन केले.
शोधवेध संशोधन महोत्सवात प्रकल्प सादर करताना साक्षी पंडित व स्वरूप काणे

आविष्कार संशोधन महोत्सवासाठी तयार केलेले पोस्टर 

        पदव्युत्तर स्तरावर निवेदिता कोपरकर आणि श्रेया पाध्ये यांनी मंगळागौर व्रत - धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अंगाने अभ्यास हा विषय निवडला होता. त्यांना प्रा. सीमा वीर यांनी मार्गदर्शन केले.

शोधवेध संशोधन महोत्सवात प्रकल्प सादर करताना निवेदिता कोपरकर व श्रेया पाध्ये

आविष्कार संशोधन महोत्सवासाठी तयार केलेले पोस्टर

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत श्रद्धा हळदणकरला उत्तेजनार्थ पारितोषिक


                पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ता. गुहागर जि. रत्नागिरी यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेकरिता मतदानासाठी ई. व्ही. एम. की मतपत्रिकेचा वापर : यापैकी काय योग्य? हा विषय देण्यात आला होता. या निबंध स्पर्धेत प्रथम वर्ष कला शाखेची विद्यार्थिनी श्रद्धा हळदणकरला उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले. तिला प्रमाणपत्र व रोख ५०१ रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

Monday, 13 January 2020

माणसाकडून माणसाकडे नेणारी विचारधारा 'युगानुयुगे तूच'


गो.जो.महाविद्यालयात प्रसिद्ध कवी अजय कांडर यांच्या दीर्घ कवितासंग्रहाचे प्रकाशन
        डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा अधोरेखित करणा-या  प्रसिद्ध कवी अजय कांडर यांच्या 'युगानुयुगे तूच' या दीर्घ कवितासंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ कवयित्री नीरजा यांच्या हस्ते झाले. गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या सेमिनार हॉल मध्ये दिनांक ६ जानेवारी रोजी हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या उपक्रमांतर्गत या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन केले होते.
            कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रम अध्यक्षा कलाशाखेच्या उपप्राचार्या डॉ.कल्पना आठल्ये, प्रसिद्ध कवी अजय कांडर, ज्येष्ठ कवयित्री नीरजा, ज्येष्ठ कवयित्री प्रा.जयश्री बर्वे, ज्येष्ठ पत्रकार सचिन परब , वाङ्मयमंडळ व मराठी विभाग प्रमुख प्रा.शिवराज गोपाळे उपस्थित होते. प्रकाशनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या चर्चासत्रात मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. 'युगानुयुगे तूच' या कवितासंग्रहाकडे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सर्व वर्गापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग म्हणून आपण पाहिले पाहिजे, असे प्रतिपादन जेष्ठ कवयित्री जयश्री बर्वे यांनी केले.कवी अजय कांडर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर दीर्घ कविता लिहून समाजातल्या सर्व स्तरातल्या वर्गाने समतेच्या विचारावर एकत्र नांदायला पाहिजे, असे यावेळी उपस्थितांना आवाहन केले. तर जेष्ठ कवयित्री नीरजा यांनी विचार संपून टाकण्याच्या या काळात 'युगानुयुगे तूच' सारखा दीर्घ कवितेचा संग्रह प्रसिद्ध होणे म्हणजे बाबासाहेबांच्या 'माणसाकडून माणसाकडे' जाण्याच्या विचाराच पुनर्जागरणच होय असे चर्चासत्रात प्रतिपादन केले. या कवितासंग्रहाबाबत आपली भूमिका मांडताना सचिन परब म्हणाले की आजच्या काळातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची गरज कवी कांडर यांनी अतिशय सोप्या भाषेत मांडली आहे.
            प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे प्रा.शिवराज गोपाळे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सीमा वीर यांनी केले. या सोहळ्यासाठी उपस्थित मान्यवरांबरोबर तरुण भारत रत्नागिरी आवृत्तीचे संपादक राजा खानोलकर, आर्ट सर्कलचे नितीन कानविंदे, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







Tuesday, 7 January 2020

गो.जो.महाविद्यालयात डॉ. अरुणा ढेरे यांचा विद्यार्थ्यांशी संवाद


           “आपण जे पाहतो त्यापेक्षा अधिक डोळसपणे साहित्यिक पाहतो. त्या सजगतेतूनच त्याचे साहित्य जन्मते. लिहिण्यासाठी सूक्ष्म निरीक्षण व अधिकाधिक वाचन हवे.” असा प्रेमळ सल्ला डॉ. अरुणा ढेरे यांनी गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना दिला. औचित्य होते मराठी विभाग व वाङ्मय मंडळ यांच्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘लेखक आपल्या भेटीला’ या कार्यक्रमाचे. दिनांक ७ डिसेंबर २०१९ रोजी महाविद्यालयाच्या डॉ.ज.शं.केळकर सेमिनार हॉलमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.
         ज्याचे आपण साहित्य वाचतो त्या साहित्यिकाला ‘याची देही याची डोळा’ अनुभवता यावे यासाठी ‘लेखक आपल्या भेटीला’ हा उपक्रम महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता मराठी विभाग व वाङ्मय मंडळातर्फे राबविला जातो. विद्यार्थांशी संवाद साधताना ‘कविता आकलन व आस्वाद’ याचे अनेक पदर डॉ. अरुणा ढेरे यांनी उलगडून दाखविले. कविता रचनेत महत्त्वाचा असतो तो ‘कवितेचा घाट ’ हे समजावून सांगताना त्यांनी कुसुमाग्रज यांच्या ‘आगगाडी आणि जमीन’ या कवितेचे सादरीकरण केले.
        कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर डॉ.अरुणा ढेरे यांच्यासह कलाशाखेच्या उपप्राचार्या डॉ.कल्पना आठल्ये , वाङ्मय मंडळ तसेच मराठी विभाग प्रमुख प्रा. शिवराज गोपाळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. निधी पटवर्धन यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.कल्पना आठल्ये यांनी केले. सदर कार्यक्रमाला प्राध्यापक आणि विद्यार्थी यांची लक्षणीय उपस्थिती लाभली होती.


ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती अरुणा ढेरे यांचे स्वागत करताना मराठी विभागप्रमुख प्रा. शिवराज गोपाळे, व्यासपीठावर उपस्थित कला शाखा उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, सूत्रसंचालन करताना डॉ. निधी पटवर्धन.



विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मा. अरुणा ढेरे



Friday, 3 January 2020

गो-जो महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा सुरु


पहिले पुष्प - 'सादरीकरणातील आनंद' विशेष व्याख्यान

          मराठी भाषा संवर्धन पंधरवडयाचे पहिले पुष्प आकाशवाणीचे निवृत्त कार्यक्रम अधिकारी श्री. गोविंद गोडबोले यांचे 'सादरीकरणातील आनंद' हे विशेष व्याख्यान दिनांक ३ जानेवारी २०२० रोजी महाविद्यालयाच्या सेमिनार हॉल मध्ये संपन्न झाले.         मराठी भाषेचे जतन व संवर्धन व्हावे याकरिता १ जानेवारी ते १५ जानेवारी या काळात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.या पंधरवडयाचे औचित्य साधून गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाचा मराठी विभाग सातत्याने भाषा संवर्धनाकरिता विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असतो.
          'सादरीकरणातील आनंद' या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथीसह कार्यक्रम अध्यक्षा कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ.कल्पना आठल्ये, वाङ्मयमंडळ व मराठी विभाग प्रमुख प्रा.शिवराज गोपाळे उपस्थित होते. व्याख्याते श्री.गोविंद गोडबोले यांनी यावेळी विशिष्ट माध्यमांसाठी संहिता कशी लिहावी, संहिता लेखन करत असताना नेमक्या कोणत्या घटकांचा विचार करणे अपेक्षित आहे, याबरोबरच संहितेचे सादरीकरण कशा पद्धतीने करावे यासंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सादरीकरणाचे विविध पैलू त्यांनी विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखविले. येणा-या काळात ६५ टक्के नोकरीच्या संधी प्रसारमाध्यमांत उपलब्ध असल्याकारणाने विद्यार्थ्यांनी त्याबाबत सजग रहावे, असा सल्ला व्याख्यानाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना दिला.
          सदर कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.शिवराज गोपाळे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ.निधी पटवर्धन यांनी केले. या कार्यक्रमाला प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी यांची उपस्थिती लक्षणीय होती.





मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

 गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त  दोन विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 'स्...