Friday, 28 February 2020

गो.जो.महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन उत्साहात संपन्न


गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात दिनांक २७ फेब्रुवारी हा 'मराठी राजभाषा दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने ह.भ.प सायली विजय मुळ्ये या विद्यार्थिनीचे 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' या विषयावरील कीर्तन व ख्यातनाम दिग्दर्शक राजेंद्र बडे यांचे 'मराठी नाटक व चित्रपट यांचा आस्वाद' यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
        मराठी भाषा दिनाच्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, ख्यातनाम दिग्दर्शक राजेंद्र बडे, मराठी विभाग प्रमुख प्रा. शिवराज गोपाळे , इतिहास विभाग प्रमुख व ज्येष्ठ प्राध्यापक आर.एच. कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा.गोपाळे यांनी मराठी विभागाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. यानंतर प्राचार्यांनी मराठी भाषेचे अलौकिकत्व कसे जपावे,भाषेचे जतन व संवर्धनाकरिता कोणते प्रयत्न करावेत यासंबंधी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी विद्यापीठ अनुदान आयोग व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या उजळणी वर्गातील प्राध्यापक देखील उपस्थित होते. सहभागी प्राध्यापक वर्गातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, इस्लामपूर,जि.सांगली येथील प्रा. अमोल पुंडलिक चांदेकर यांनी महाराष्ट्र गीत सादर केले.
        या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कीर्तनात पूर्वरंगात सायली हिने मराठी भाषेची उत्पत्ती कशी झाली यावर भाष्य केले. 'आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने' यावर निरुपण सादर करून आद्य आत्मचरित्रकार, कीर्तन परंपरेचे प्रवर्तक नामदेवमहाराजांवरील आख्यान सादर केले. नाटक व चित्रपट माध्यमांचा आस्वाद कसा घ्यावा याचे उपस्थितांना मार्गदर्शन करताना राजेंद्र बडे यांनी आवर्जून नमूद केले की 'स्वतःच्या अनुभवातून, प्रेरणांतून जी कलाकृती तयार होते तिच्यामुळेच प्रेक्षकांना समाधान देता येते. चित्रपटांमध्ये शब्दांच्या भाषेपेक्षा 'चित्रभाषा' आनंददायक असते. ती समजून घेता आली पाहिजे.'
        मराठी विभागाने या निमित्ताने 'माझा मराठाचि बोलू कवतुके' या विषयावर भित्तीपत्रक व मराठी भाषेतील विविध ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित केले होते. कार्यक्रमाच्या दरम्यान लेखन नैपुण्य प्राप्त केलेल्या श्रद्धा हळदणकर या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निधी पटवर्धन यांनी केले. महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी बहुसंख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.






Monday, 3 February 2020

राज्यस्तरीय ललित लेखन स्पर्धेत तेजस खरे प्रथम

          अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, महाराष्ट्र प्रदेश आयोजित १८ व्या प्रतिभा संगम विद्यार्थी साहित्य संमेलनात तेजस खरे या विद्यार्थ्यास ललित लेखन साहित्य प्रकारात प्रथम पारितोषिक प्राप्त झाले.
           लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यनगरी, महाराजा अग्रेसन फौंडेशन, जालना येथे दि. १ व २ फेब्रुवारी २०२० रोजी १८ व्या प्रतिभा संगम विद्यार्थी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये द्वितीय वर्ष वाणिज्य या वर्गातील विद्यार्थी तेजस नारायण खरे हा मराठी वाङ्मय मंडळातर्फे सहभागी झाला होता. त्याने ललित लेखन साहित्य प्रकारात प्रथम पारितोषिक पटकाविले. या स्पर्धेचे परीक्षण स्वाती दामोदरे यांनी केले. तर पारितोषिक वितरणाप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार रवींद्र गोळे उपस्थित होते. प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन  तेजस खरे यास गौरविण्यात आले.

विचारवेध संमेलन अंतर्गत आयोजित निबंधलेखन स्पर्धेत श्रद्धा हळदणकरला उत्तेजनार्थ पारितोषिक

          विचारवेध संमेलन २०२० अंतर्गत निबंधलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये मराठी विभागाच्या श्रद्धा हळदणकर या विद्यार्थिनीने सहभाग घेतला होता. प्रथम वर्ष कला शाखेत शिकणाऱ्या श्रद्धाला या स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले. प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख १००० रुपये असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे.

Sunday, 19 January 2020

नारायण सुर्वे यांच्या चार शब्द या कवितेचा आशय


           नारायण सुर्वे हे मराठीतील पहिले आणि शेवटचे कामगार कवी म्हणून ओळखले जातात. मुंबईतील कापड गिरण्या, तेथील कामगार, त्यांचे खडतर जीवन, महानगरातील दारिद्र्य, विषमता यांना त्यांच्या कवितेत महत्त्वाचे स्थान होते. कारखानदार आणि सत्ताधारी विरुद्ध कष्टकरी कामगार यांच्यातील वर्गसंघर्ष त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी आहे. कार्ल मार्क्स यांच्या वर्गसिद्धांताप्रमाणे कला या नेहमी आहे रे (भांडवलशहा आणि सत्ताधारी) वर्गाच्या धार्जिण्या असतात. त्यांवर नेहमी आहे रे वर्गाच्या विचारांची छाया जाणवत असते. मराठी साहित्यही याला अपवाद नाही. साहित्याच्या या प्रवृत्तीच्या विरोधात जाऊन शोषितांची, कष्टकऱ्यांची जीवनव्यथा नारायण सुर्वे यांनी  आपल्या कवितेत मांडली. आपल्याला कवितेची स्फूर्ती कशी मिळाली आणि आपल्या कवितेचे स्वरूप कशाप्रकारचे आहे हे त्यांनी आपल्या चार शब्द या कवितेत स्पष्ट केले आहे.
          नारायण सुर्वे म्हणतात की, आमच्या रोजी-रोटीचा, दैनंदिन जीवनाच्या संघर्षाचा सवाल नेहमीचाच आहे. आमच्या हातावर आमचे पोट आहे. कधी कारखान्यात काम मिळते, कधी संप होतो, कामावरून कमी केले जाते, तरीही आम्ही कामगार तळपत्या तलवारीप्रमाणे तडफदार आहोत. आमच्यावर होणाऱ्या अन्यायाची आम्हाला जाणीव आहे. त्याविरुद्ध आम्ही संघर्ष करत आहोत. मात्र आमचे हे जीवन कधीच इथल्या सारस्वतांनी (साहित्यिकांनी) आपल्या लेखनात चितारले नाही. त्यामुळे साहित्यिकांनो आता मी तुमच्या आशयविश्वात आम्हा शोषितांची व्यथा मांडून थोडा गुन्हाच करणार आहे असेही ते उपरोधाने म्हणतात.
          आपल्या कवितांच्या आशयात काय आहे हे सांगताना ते म्हणतात की या जीवनात आम्ही जे सहन केलं, जे पाहिलं, निरीक्षणातून ज्या गोष्टींचे अंदाज बांधले ते तर माझ्या कवितेत आहेच मात्र त्याच्या जोडीने कष्टकरी वर्ग म्हणून माझ्या जगाची वेदना आणि स्वेदगंधही त्यात आहे. या खडतर मार्गावर चालताना कधी चुकलो, काही गोष्टी गमावल्या तर काही नवीन शिकलोही आहे. जसं आयुष्य मी जगलो अगदी तसंच आयुष्य मी माझ्या कवितेत शब्दबद्ध करणार आहे.
          माणसाला जगण्यासाठी अन्न गरजेचे असतेच, मात्र त्याला अन्नाबरोबरच आत्मसन्मानही हवा असतो याची जाणीवही आता आम्हाला झाली आहे. त्यामुळेच आता माझं विश्व, माझे कामगार बंधू नव्या जगासाठी, परिवर्तनासाठी सिद्ध होत आहेत. अन्यायापुढे झुकणाऱ्या वृत्तीला, गुलामीला नष्ट करण्यासाठी आता माझे शब्दच शस्त्रे परजणार आहेत. आमच्यावर युगानुयुगे अन्याय होत आलेला आहे. मात्र आजवर हा अन्याय आम्ही सहन केला म्हणून तुम्ही बेसावध राहू नका. ही शांतता वादळापूर्वीची शांतता आहे. त्यापुढे एक भीषण संघर्षाला सुरूवात होणार असल्याचा संकेत कवी आपल्या कवितेतून देत आहे. अशाप्रकारे चार शब्द हे नारायण सुर्वे यांची कविता वर्गसंघर्षांमुळे कष्टकऱ्यांच्या शोषणाला अधोरेखित करते आणि त्याचप्रमाणे त्यांना आलेल्या आत्मभानाची जाणीवही स्पष्ट करते.

नोटच्या PDF साठी खालील दुव्यावर टिचकी द्या.
https://drive.google.com/open?id=1fqGf_x6phY5tt7DTuGWF_N2rMfvxvTod

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

 गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त  दोन विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 'स्...