Thursday, 14 November 2019

तेजस प्रकाशन, कोल्हापूर आयोजित कथालेखन स्पर्धेत पूर्वा देवस्थळी द्वितीय

   तेजस प्रकाशन, कोल्हापूर यांनी आपल्या आनंद ब्लॉगसाठी कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. या कथालेखन स्पर्धेत मराठी विभागातील तृतीय वर्षात शिकणारी विद्यार्थिनी पूर्वा प्रशांत देवस्थळी हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
       पूर्वा देवस्थळी हिची 'अस्तित्व' ही कथा द्वितीय क्रमांकासाठी  पात्र ठरली असून त्याकरिता ५०० रुपयांचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे आयोजक संस्थेच्या ब्लॉगवर ही कथा ऑनलाईन प्रकाशित करण्यात आली आहे. आपणही ही कथा 'अस्तित्व' या दुव्यावर टिचकी देऊन वाचू शकता.

'मनाचे श्लोक' या विषयावर श्री. ओंकार मुळ्ये यांचे व्याख्यान संपन्न

         मराठी विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रमाअंतर्गत अभ्यासपत्रिका क्र. १२.२ : ''प्राचीन कालखंडाचा अभ्यास - शिवकाळ'' याअंतर्गत 'मनाचे श्लोक' या विषयावर श्री. ओंकार मुळ्ये यांचे व्याख्यान दि. २३ ऑक्टोबर २०१९ रोजी संपन्न झाले.

          श्री. ओंकार मुळ्ये हे विभागाचे माजी विद्यार्थी असून शहरातील पटवर्धन हायस्कूल येथे ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे उत्तम प्रवचनकार म्हणूनही त्यांचा लौकिक आहे. श्री. मुळ्ये यांचे डॉ. निधी पटवर्धन यांनी विभागाच्या वतीने भेटवस्तू देऊन स्वागत केले. श्री. मुळ्ये यांनी 'मनाचे श्लोक' या विषयावर रसाळ विवेचन केले. मनाच्या श्लोकांची जन्मकथा सांगितली. भुजंगप्रयात वृत्तातली श्लोकांची रचना, त्यातल्या १२ मात्रांचे विश्लेषण, सरस्वतीची लुप्तता-उपासना, तिची गरज, समर्थांचा लोकान्त व एकांत, नवविधा भक्ती प्रकार समजावून सांगितले. आजच्या काळात मनाच्या श्लोकांची आश्वासकता सांगितलीत. ते वैचारिक मूल्य विद्यार्थ्यांत बिंबवले. याप्रसंगी पदव्युत्तर विभागातील विद्यार्थी, प्रा. सायली पिलणकर आदी उपस्थित होते.


श्री. ओंकार मुळ्ये यांचे स्वागत करताना डॉ. निधी पटवर्धन



श्री. मुळ्ये व उपस्थित विद्यार्थी व प्राध्यापक

Friday, 2 August 2019

लोकमान्य टिळक पुण्यतिथीच्या औचित्याने भित्तीपत्रकाचे अनावरण

लोकमान्य टिळक स्मृतिशताब्दी प्रारंभ वर्षाच्या निमित्ताने मराठी विभागांतर्गत पत्रकारिता (एस.वाय.बी.ए) विषयाच्या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांची पत्रकारिता या विषयावर भित्तिपत्रक तयार केले. योगतज्ञ श्रीकांत क्षीरसागर यांच्या हस्ते भित्तिपत्रकाचे अनावरण झाले. यावेळी मराठी विभागप्रमुख शिवराज गोपाळे, डॉ. निधी पटवर्धन, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ.विवेक भिडे , सीमा वीर आणि पत्रकारितेचे विद्यार्थी उपस्थित होते.

  • टिळक युगातील पत्रकारिता : शिवानी शिर्के, स्वप्नाली गराटे, श्रेया जाधव , ऐश्वर्या
  • पत्रकार लोकमान्य टिळक : अक्षय झोरे, प्रथमेश बोडेकर
  • संपादक म्हणून टिळकांची भूमिका : ओंकार ओक ,साक्षी पंडित, मुग्धा पुरोहित , अमिषा पवार, राजदीप कांबळे
  • टिळकांची पत्रकारिता : वरदा आर्ड्ये, स्वरूप काणे, चैत्राली लिमये ,सुखदा ताटके, प्रियांका ढोकरे, साक्षी मोहिते
  • केसरी : वरदा पटवर्धन
  • केसरीतील अग्रलेख शीर्षके : वरदा पटवर्धन
  • केसरी वृत्तपत्रातील अग्रलेखांची यादी : प्रथमेश बोडेकर, गणेश आलीम, अर्णव चव्हाण
  • इतिहासातील सोनेरी पान केसरी : स्वप्नाली गराटे, तेजस्विनी हरचेकर, नम्रता गुरव, अमिषा पवार
  • केसरीच्या पहिल्या अंकाचे मुखपृष्ठ : वरदा आर्ड्ये, स्वरूप काणे, प्रियांका ढोकरे
  • लोकमान्य टिळकांचे रेखाचित्र : स्वरूप काणे
  • पत्रकारिता विषयाचे शीर्षक रेखाटन : राकेश रामाणे, सोपान निवळकर




Friday, 21 June 2019

'लेखक आपल्या भेटीला' अंतर्गत कवी कैलास गांधी यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद








मराठी विभागातील विद्यार्थिनींचे सूर्यनमस्कार स्पर्धेत सुयश

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित्याने दि. २१ जून २०१९ रोजी राष्ट्रीय सेवा समिती, बाळासाहेब पित्रे योग संशोधन व प्रशिक्षण केंद्र झाडगाव, रत्नागिरी आयोजित सूर्यनमस्कार स्पर्धेत मराठी विभागाच्या विद्यार्थिनी जागृती महाडिक, तन्वी बेर्डे, पूर्वा देवस्थळी यांनी सहभाग घेत व्दितीय क्रमांक प्राप्त केला. या विद्यार्थिनींना प्रमाणपत्र आणि सांघिक चषक घेऊन गौरविण्यात आले.


Wednesday, 27 February 2019

सावित्री जोतिबा समता उत्सवात मराठी वाङ्मय मंडळाचे सुयश

मिळून साऱ्याजणी पुणे आणि वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली यांनी महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थीनींसाठी आयोजित केलेल्या सावित्री जोतिबा  समता नाट्योत्सव २०१८-१९  नाट्यांश स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाने सहभाग नोंदविला. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सेवाव्रती इंदिराबाई हळबे यांच्या जीवनावर आधारित 'ते चंदनाचे खोड' हा नाट्याविष्कार सादर केला. विद्यार्थ्यांच्या या संघाला उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.


गो. जो. महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाचे घवघवीत यश

       राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग आयोजित साडवली (देवरूख) झालेल्या एकपात्री अभिनय स्पर्धा व काव्यवाचन स्पर्धेत जिल्हास्तरावर गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळाच्या पाच विद्यार्थ्यांनी पारितोषिके पटकावली. काव्यवाचन स्पर्धेत विजय सुतार आणि एकपात्री अभिनय स्पर्धेत स्मितल चव्हाण यांनी प्रथम क्रमांक पटकावला. हे दोन विद्यार्थी दि. १ व २ फेब्रुवारी रोजी राज्यस्तरावर होणाऱ्या महाअंतिम फेरीत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रतिनिधीत्व करतील.
     
      २०१८-१९ हे वर्ष कवी, नाटककार राम गणेश गडकरी यांचे स्मृतिशताब्दी वर्ष; तर महाकवी ग.दि. माडगुळकर आणि सिद्धहस्त लेखक पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिम्मित्ताने या तीन साहित्यिकांच्या लेखनावर आधारित राज्य मराठी विकास संस्थेने राज्य पातळीवर या दोन्ही स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धा शालेय व महाविद्यालयीन गटात घेण्यात येत आहेत. दि. २१ जानेवारी रोजी साडवली (देवरूख) येथे संपन्न झालेल्या महाविद्यालयीन जिल्हास्तर स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाच्या पुढील  विद्यार्थ्यांनी बक्षिसांची कमाई  केली. काव्यवाचन स्पर्धा - विजय सुतार (प्रथम) (रू.3000/-  व पुस्तक), अस्मिता गोखले (द्वितीय) (रू. 2500/-  व पुस्तक), एकपात्री अभिनय स्पर्धा - प्रथम - स्मितल चव्हाण (3000/- व पुस्तक),चतुर्थ - दीप्ती वहाळकर (1500/- व पुस्तक),पंचम- श्रेया जोशी (1000/- व पुस्तक) अशी पारितोषिके प्राप्त केली.
      विजय सुतार याने ग.दि. माडगुळकर यांची 'जोगिया' हे कविता सादर केली. अस्मिता गोखले हिने गोविंदाग्रजांची 'प्रेम आणि मरण' ही कविता सादर केली. तर स्मितल चव्हाण हिने पु. ल. देशपांडे यांच्या 'सुंदर मी होणार' मधील दीदीची भूमिका साकारली. दीप्ती वहाळकर हिने पु. ल. देशपांडे यांच्या 'घरगुती भांडणे' या विनोदी लेखावर अभिनय केला. श्रेया जोशी हिने पु. ल. देशपांडे यांची 'फुलराणी' साकारली. या विद्यार्थ्यांसाठी मराठी वाङ्मय मंडळाने कसून मेहनत घेतली होती. यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर आणि संस्थेच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन यांनी अभिनंदन केले आहे.

'रंगवैखरी' महाअंतिम फेरीत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाला पावणेदोन लाखाची सहा पारितोषिके

      महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेतर्फे आयोजित रंगवैखरी (पर्व दुसरे) या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी ६ जानेवारी रोजी मुंबई येथे रवींद्र नाट्यमंदिरात प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात पार पडली. महाराष्ट्र आणि बेळगाव केंद्रातून विभागीय अंतिम फेरीत निवडून आलेल्या सात संघांच्या नाटयाविष्कारामध्ये चुरस रंगली. रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाने बसवलेल्या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगावर आधारित  'अधिक देखणे तरी' या एकांकिकेने सांघिक द्वितीय पारितोषिक पटकावत पाच वैयक्तिक बक्षिसे खेचून आणली. रुपये सव्वा लाख रोख, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन संघाला गौरविण्यात आले. या स्पर्धेला नाट्यसंमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी, नंदेश उमप, शर्वरी जमेनीस, परेश मोकाशी, रेखा इनामदार-साने, शशांक शेंडे हे परीक्षक म्हणून लाभले. यंदाच्या रंगवैखरी साठी 'नव्या वाटा' हा विषय देण्यात आला होता.
      या स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालाच्या  विनायक पांचाळ व श्वेत भागवत यांना सर्वोत्कृष्ट शिल्पकलेचे रु.१५००० आणि मानचिन्ह असे प्रथम पारितोषिक मिळाले. हृषीकेश वैद्य याला सर्वोत्कृष्ट अभिनय (पुरुष) द्वितीय रु.१०,००० आणि मानचिन्ह, श्रेया जोशी हिला सर्वोत्कृष्ट अभिनय (स्त्री) द्वितीय रु.१०,००० आणि मानचिन्ह, निरंजन सागवेकर याला सर्वोत्कृष्ट चित्र रु.१०,००० आणि मानचिन्ह, द्वितीय आणि प्रसन्न खानविलकर याला सर्वोत्कृष्ट लेखक, द्वितीय पारितोषिक रु.१०,००० आणि मानचिन्ह देऊन मान्यवरांनी सत्कार केला. या एकांकिकेसाठी मराठी वाङ्मय मंडळाच्या  डॉ. निधी पटवर्धन यांचे मार्गदर्शन लाभले.
        गोगटे- जोगळेकर महाविद्यालायच्या राधाबाई शेट्ये सभागृहात 'मराठी भाषा संवर्धन पंधरावड्या निमित्त या एकांकिकेचे सादरीकरण झाले. या कार्यक्रमाला र.ए. सोसायटीच्या अध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, सचिव सतीश शेवडे, संस्थेचे पदाधिकारी डॉ. कल्पना मेहता, अॅड. प्राची जोशी, उदय लोध, राजन मलुष्टे, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, मराठी वाङ्मय मंडळ प्रमुख प्रा. शिवराज गोपाळे, प्राध्यापक वर्ग व महाविद्यालतील कर्मचारी आणि विदयार्थी उपस्थित होते. मान्यवरांनी विजेत्या संघाचे कौतुक केले.


मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

 गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त  दोन विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 'स्...