गो.जो. महाविद्यालयात चित्रपट रसास्वाद आणि शॉर्टफिल्म व डॉक्युमेंटरी मेकींग कार्यशाळा संपन्न
सिनेमा पाहणारा माणूस – अशोकजी राणे यांचे मार्गदर्शन
फोटो : डॉ. नितीन चव्हाण, प्रा. प्राचार्य पी. पी. कुलकर्णी, अशोकजी राणे, मराठी विभागाच्या सीमा वीर आणि डॉ. निधी पटवर्धन व सहभागी
गोगटे-
जोगळेकर महाविद्यालय आर्टस् फिल्म क्लब आणि रत्नागिरी फिल्म सोसायटी यांच्या
संयुक्त विद्यमाने चित्रपट रसास्वाद आणि शॉर्टफिल्म व डॉक्युमेंटरी मेकींग
कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक ८,९,१० जानेवारी या कालावधीत ही
कार्यशाळा गो. जो. महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं.केळकर सेमिनार हॉलमध्ये पार पडली.
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी.पी.कुलकर्णी
यांनी आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर रत्नागिरी
फिल्म सोसायटीचे डॉ. नितीन चव्हाण, आर्टस् फिल्म क्लबचे डॉ. वासुदेव आठल्ये व
ज्येष्ठ चित्रपट समीक्षक व आस्वादक आणि कार्यशाळेचे मार्गदर्शक अशोकजी राणे
उपस्थित होते. कार्यक्रम समिती समन्वयक व मराठी विभागाच्या प्राध्यापिका डॉ. निधी
पटवर्धन यांनी प्रास्ताविकात या कार्यशाळेची गरज, महत्त्व आणि महाविद्यालयाची
भूमिका समजून दिली. डॉ. नितीन चव्हाण यांनी प्रमुख अभ्यागत श्री. अशोक राणे यांचा
परिचय करून दिला आणि कार्यशाळेमध्ये सह- समन्वयक म्हणून रत्नागिरी फिल्म सोसायटीचा सहभाग असल्याचा आनंद
व्यक्त केला.
सदर
कार्यशाळेच्या पहिल्या व दुस-या दिवशी 'चित्रपट रसास्वाद' या विषयावर सिनेमाचे
विद्यापीठ असणाऱ्या अशोकजी राणे यांनी मार्गदर्शन केले. चित्रपटाचा उगम व विकास,
चित्रपटाची भाषा तसेच चित्रपट कसा पहावा
यावर विविध चित्रपट दाखवित सहभागी झालेल्यांशी सविस्तर चर्चा केली. चित्रपटाचा
रसास्वाद घ्यायचा असेल तर खुल्या मनाने त्याकडे पाहिले पाहिजे. चित्रपटच नव्हे तर
कोणतीही कला जाणून घेताना तिच्या मुळाशी गेले पाहिजे. यासाठी सातत्य जपले पाहिजे असे
अशोकजींनी आवर्जून नमूद केले. हॅपी ॲनिवर्सरी, परोक्ष, सिद्धिविनायक, अभिनेत्री, चैत्र, गिरण या आणि अशा
सारख्या काही प्रातिनिधिक शॉर्ट फिल्म तीन दिवसांमध्ये दाखविल्या गेल्या तर
प्रत्येक दिवशी एक चित्रपट याप्रमाणे पहिल्या दिवशी हिंदी संगम सिनेमावर आधारित 'डेस्पिरादो
स्क्वेअर' हा इस्रायली चित्रपट दाखविला गेला, दुसऱ्या दिवशी इंग्रजी 'ड्वेल' हा चित्रपट तर समारोपाला 'मसान'
हा हिंदी चित्रपट दाखविण्यात आला. कार्यशाळेच्या तिसऱ्या दिवशी शॉर्टफिल्म व
डॉक्युमेंटरी मेकींग यावर सहभागींना मार्गदर्शन केले. डॉक्युमेंट्री म्हणजे काय हे
सांगून त्याच्यासाठी उपलब्ध असणारा निधी कसा मिळवायचा, फेस्टिवलसाठी फिल्म कशा पाठवायच्या ते अगदी स्क्रीन प्ले, दिग्दर्शन, फिल्म मेकिंग, रसास्वादातील बारीकसारीक
मुद्दे अशा विविध विषयांवरती कार्यशाळेत चर्चा झाली.
सदर
कार्यशाळेत विविध वयोगटातील २१ प्रशिक्षणार्थी सामील झाले होते. असेच उपक्रम
वारंवार भेटीला यावेत अशी प्रतिक्रिया सहभागी झालेल्या सर्वांनीच आभार
प्रदर्शनाच्या कार्यक्रमात व्यक्त केली. या कार्यक्रमाची तांत्रिक बाजू
महाविद्यालयाच्या आर्टस् फिल्म क्लबच्या सदस्यांनी सांभाळली. डॉ. निधी पटवर्धन
यांनी तीन दिवस सूत्रसंचालन केले. या कार्यशाळेसाठी अभ्यागत सुचवणे ते ही कार्यशाळा विद्यार्थ्यापर्यंत पोचवणे यासाठी मराठी विभागाचे भरघोस साहाय्य झाले.